तासगाव : अनियमित, तसेच कधी अचानक उच्च दाबाने, तर कधी कमी दाबाने होणारा वीज पुरवठा यामुळे सामान्य वीज ग्राहकाला याचा फटका बसत आहे. घरगुती उपकरणे निकामी होण्यापासून शेतीपंप जळण्यापर्यंत अनेक घटना सातत्याने तालुक्यात घडत आहेत. नुकसान झाल्यानंतरही महावितरणच्या कारभारात सुधारणा झालेली नाही. नियमांचा बोजवारा, दरिद्री कारभार याामुळे असणारी सुविधांची वानवा, अशा भोंगळ कारभारामुळे ग्राहकांना नुकसानीचा शॉक बसत आहे.महावितरणच्या कमी दाबाच्या ट्रान्स्फॉर्मरवर अतिरिक्त दाब पडल्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी सातत्याने ट्रान्स्फॉर्मर जळण्याचा घटना घडत आहेत. एकदा ट्रान्स्फॉर्मर जळाल्यानंतर तो नव्याने बसविण्यासाठी अनेक आठवडे, महिने वाट पाहावी लागते. त्यामुळे अनेकदा शेतीचे नुकसानही होते. विद्युत दाब नियंत्रित नसल्यामुळे घरगुती उपकरणांचे अनेकदा नुकसान झालेले आहे. महावितरणकडून ग्राहकांचे नुकसान झाल्यास किंवा वेळेत काम झाले नाही, तर नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे. मात्र अशा सर्वच नियमांचे राजरोसपणे उल्लंघन होत आहे. अनेक गावांतील महावितरणचे ट्रान्स्फॉर्मर धोकादायक अवस्थेत आहेत. ट्रान्स्फॉर्मरच्या खालील बाजूस डिस्ट्रीब्युशन बॉक्स असतो. हा बॉक्स सुस्थितीत असेल, तर कमी-जास्त वीज दाब असला तरी, ट्रान्स्फॉर्मर निकामी होत नाही. मात्र बहुतांश ठिकाणचे डिस्ट्रिब्युशन बॉक्स खराब झाल्याचे दिसून येते. अनेक ट्रान्स्फॉर्मरमध्ये फ्यूज नाहीत, फ्यूज गेल्यास फ्यूज वायर मिळत नाही. त्यामुळे वायरमनना पदरमोड करून फ्यूजची वायर घालावी लागते. वीज पुरवठ्यासाठी प्राथमिक सुविधाही महावितरणकडून उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी ही यंत्रणा धोकादायक बनली आहे. काही ठिकाणी वेळेत वीज सुरळीत व्हावी, यासाठी स्वत: शेतकरीच जीवघेण्या पध्दतीने फ्यूजची वायर घालण्याचे काम करतो. एकूणच महावितरणच्या दशकपूर्तीनंतरही सर्व कारभार भोंगळच आहे. या कारभाराचा शॉक सामान्य ग्राहकाला बसत असल्याचे चित्र आहे. (समाप्त)नोंदवहीच नाही ग्रामीण भागातील सेवेचा दर्जा आणखी उंचावण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात नोंदवही ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने नुुकताच घेतला आहे. खंडित वीजपुरवठ्याबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी असतात. वेळेत काम होत नाही, त्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण होतो. त्यासाठी महावितरणकडून प्रत्येक ग्रामपंचायतीत नोंदवही ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र बहुतांश ग्रामपंचायतीत नोंदवही दिसून येत नाही. तसेच नोंदवही अडगळीच्या ठिकाणी पडलेली आहे.
भोंगळ कारभाराचा ग्राहकांना शॉक
By admin | Published: July 12, 2015 11:35 PM