भिलवडी
: भिलवडी (ता. पलूस) येथील महावितरणच्या पेटीतील फ्यूजा व तांब्याच्या पट्ट्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
गुरुवार, दि.२२ एप्रिल रोजी दुपारी महादेव मंदिर परिसरातील वीज गेली. परिसरातील रहिवाशांनी वीज कधी येणार याबाबतची महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, वीज सुरू असल्याचे सांगण्यात आले. या परिसरात वीज बंद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शाखा लाईनमन सुखदेव पाटील व वायरमन राहुल निकम यांनी त्या ठिकाणी भेट दिली. यावेळी विजेच्या
खांबावरील पेटीतील फ्यूज व तांब्याच्या पट्ट्या गायब असल्याचे दिसून आले.
सहायक शाखा अभियंत्या उज्ज्वला सदाकळे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
गेल्या काही महिन्यांपासून परिसरातील शेतकऱ्यांच्या पाणी उपसा पंपाच्या केबल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले असतानाच भरदिवसा गावातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या पेटीतील फ्यूज व तांब्याच्या पट्ट्या चोरीला गेल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
फोटो - भिलवडी येथील महादेव मंदिर परिसरातून या पेटीतील फ्यूजा व तांब्याच्या पट्ट्या अज्ञातांनी पळविल्या.