सांगली जिल्ह्यात काँग्रेसला धक्का, संपतराव माने यांच्या वारसदारांच्या हाती ‘घड्याळ’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 12:11 PM2023-09-26T12:11:39+5:302023-09-26T12:12:06+5:30
शरद पवार गटात सामील : जयंत पाटील यांचे नेतृत्व मान्य
दिलीप मोहिते
विटा : महाराष्ट्राच्या स्थापनेपासून संपूर्ण सांगली जिल्ह्यावर काँग्रेसची कमांड ठेवणारे खानापूरचे नेते माजी आ. स्व. संपतराव माने यांच्या वारसदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार व प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे सोमवारी जाहीर केले. यावेळी स्व. माने यांचे वारसदार राजकुमार माने, काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र माने, विराज माने यांच्यासह त्यांच्या समर्थक गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘घड्याळ’ हातात घेतले.
खानापूरचे माजी आ. स्व. संपतराव माने यांनी पहिल्यापासून काँग्रेसचे तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात नवे वादळ उठविले होते. एकेकाळी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूकीवेळी संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेसची उमेदवारी खानापूर तालुक्यातून निश्चित केली जात होती. यशवंत साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देणारे माजी आ. स्व. माने यांच्या माध्यमातून काँग्रेसला मोठी ताकद मिळाली होती.
त्यांच्या पश्चात स्व. माने यांचे वारसदार असलेले राजकुमार माने, राजेंद्र माने यांनीही काही वर्षे काँग्रेसला उर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न केला. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूका गावपातळीवर आघाडीतून लढविल्या असल्या तरी त्यांचे काँग्रेस पक्षावरील त्यांचे प्रेम व त्यांनी पक्ष वाढीसाठी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत.
खानापूर पूर्व भागातील काँग्रेसचे माजी जि. प. सदस्य सुहास शिंदे यांनी मात्र माने समर्थक कार्यकर्त्यांना बाजूला ठेऊन शिवसेनेशी जवळीक करीत नगरपंचायतीच्या निवडणूका लढविल्या.
तरीही माजी आ. स्व. संपतराव माने यांचे वारसदार असलेले राजकुमार व राजेंद्र माने यांनी त्यांचा गट कायम शाबूत ठेवला. काँग्रेसचीच तालुक्यात वाताहत व गटबाजीला उधाण आले असताना माजी आ. स्व. माने यांच्या वारसदारांनी वेगळा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. शरद पवार व प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांच्या गटात सहभागी झाले.
यापुढे स्व. माने यांच्या वारसदारांसह समर्थक कार्यकर्त्यांचा गट खा. पवार व आ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे जाहीर केले. सोमवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी आ. स्व. संपतराव माने यांच्या खानापूर येथील निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी राजकुमार माने, राजेंद्र माने, विराज माने, हर्षल तोडकर यांनी आ. पाटील यांचे स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक, सुशांत देवकर, किसनराव जानकर, अॅड. संदीप मुळीक, विशाल पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.