सांगली : दुसऱ्याच रुग्णाचा मृतदेह तुमच्याच रुग्णाचा आहे असे म्हणून सिव्हिलच्या प्रशासनाने मंगळवारी चांगलाच गोंधळ घातला. तो रुग्ण अजूनही जिवंत आहे. मात्र तोच मृत झाल्याचे प्रमाणपत्र सिव्हिल प्रशासनाने दिले. या गोंधळाचा रुग्णाच्या नातेवाईकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.तासगाव येथील अविनाश उर्फ चिलू दादोबा बागवडे (वय 55) यांना दहा दिवसापूर्वी सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास बागवडे यांचा मृत्यू झाला आहे, असे सिव्हिलमधून फोनवरून कळवण्यात आले.
मृतदेहाची उत्तरीय तपासणी करायची असल्याने तातडीने या असेही नातेवाईकांना त्यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर नातेवाईक तातडीने सांगलीत आले. त्यांना थेट उत्तरीय तपासणी कक्षात नेण्यात आले. तेथे बागवडे यांच्या पुतण्याने हा मृतदेह अविनाश बागवडे यांचा नसल्याचे सांगितले. तरीही उत्तरीय तपासणी करून त्यांना जबरदस्तीने मृतदेह ताब्यात घेण्यास भाग पाडले. यावेळी नातेवाईकांना बागवडे यांच्या मृत्यूचा दाखलाही दिला आहे.