सांगली : शुभ्र कुर्ता-पायजमा, कमरेला भगवा शेला, डोईवर भगवा फेटा आणि उत्साहाच्या अमाप लाटा मनी घेऊन सांगलीच्या पुरोहित कन्या शाळेच्या विद्यार्थीनींनी बुधवारी काढलेल्या शोभायात्रेने शारदोत्सवाचा प्रारंभ झाला. शाळेत देवीची प्रतिष्ठापना करून सुरू झालेल्या या शारदोत्सवाचा समारोप रविवारी महाहादग्याच्या कार्यक्रमाने होणार आहे.सांगलीच्या केंगणेश्वरी मंदिरापासून सकाळी थाटात शोभायात्रा निघाली. पाचशेहून अधिक विद्यार्थीनींचा सहभाग असलेल्या या शोभायात्रेत झांजपथक, लेझिम पथक, ध्वजपथक, फलकपथक अशा विविध पथकांचा समावेश होता. यामध्ये देवीची पालखीही सहभागी होती.
मंदिरापासून सुरू झालेली ही यात्रा हरभट रोड, महापालिका, राजवाडा चौक या मार्गे महाविद्यालयात आली. याठिकाणी पारंपारिक पद्धतीने व उत्साहात शोभायात्रेचे व देवीच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडिलकर यांनी सप्तनिक पुजा केली. यावेळी शाला समितीचे अध्यक्ष अरविंद मराठेही उपस्थित होते.शारदादेवीची प्रतिष्ठापना संस्थेचे संचालक विपिन कुलकर्णी यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक श्रद्धा केतकर, उपमुख्याध्यापक भारत घाडगे, पर्यवेक्षक श्रीकांत नांदगावकर, सांस्कृतिक विभागप्रमुख उमा संभस, नियंत्रक दयानंद बेंद्रे व रघुवीर रामदासी तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.शारदोत्सवाची परंपरा २0११ पासून सुरू झाली. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात शोभायात्रा, गायन स्पर्धा, महाहादगा यांचा समावेश असतो. पाचव्या दिवशी होणाऱ्या महाहादग्याच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता करण्यात येते. माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या सुमारे अडिच ते तीन हजार विद्यार्थीनी या महाहादग्यात सहभागी होत असतात. त्यामुळे हा शहरातील सर्वात मोठा हादगा म्हणून प्रसिद्ध आहे.