फोटो ओळ : तासगाव तालुक्यात सुरू असणारे गौण खाणींचे पंचनामे चुकीच्या पद्धतीने असल्याने त्या निषेधार्थ पाण्याच्या टाकीवर चढून प्रशांत केदार यांनी आंदोलन केले.
तासगाव : प्रशासनाकडून तासगाव तालुक्यातील स्टोन क्रशर यांची तपासणी सुरू आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एटीएस पद्धतीद्वारे आणि ड्रोनचा वापर करून तपासणी केली जात नसल्याचा आरोप करून, प्रशांत केदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
तासगाव तालुक्यात गेल्या दोन वर्षांत अवैध मार्गाने झालेल्या दगड व मुरूम उत्खननाचे पंचनामे करावेत. गौण खनिजचोरीस जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावे. सात दिवसांत कारवाई न झाल्यास मंत्रालयावरून उडी मारण्याचा इशारा सामजिक कार्यकर्ते प्रशांत केदार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला होता.
याची तत्काळ दखल घेत प्रांताधिकारी यांनी एक समिती नेमून तालुक्यातील पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत; परंतु सदर पंचनामे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे ई.टी.एस. पद्धत व ड्रोनने केले जात नाहीत. सदर पंचनामे नियमांना धरून नाहीत. केवळ दिखाऊपणा करण्यात येत असल्याने प्रशांत केदार यांनी जिल्हाधिकारी कार्यलयाच्या दक्षिण बाजूस असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले. सुट्टीच्या दिवशी आंदोलन घडल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली.
यावेळी प्रांताधिकारी यांनी पंचनाम्यातील त्रुटी दूर करून पंचनामे करण्याचे आश्वासन दिल्यानंतर केदार यांनी टाकीवरून उतरून आंदोलन स्थगित केले.