सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदासाठी सत्ताधारी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे नेते आमदार पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. दरम्यान, सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्यांनी शुक्रवारी विजय बंगल्यावर रिघ लावली होती. जयश्रीताई मदन पाटील यांना भेटून, अनेकांनी स्थायीत वर्णी लावण्यासाठी साकडे घातले. स्थायी समितीच्या नव्या आठ सदस्यांची १ सप्टेंबर रोजी निवड होणार आहे. सत्ताधारी काँग्रेसमधून तीन सदस्य निवडले जाणार आहेत. या तीन जागांसाठी सत्ताधारी गटात मोठी चुरस आहे. काँग्रेसमधील प्रतीक्षा यादी मोठी असल्याने कोणाला संधी मिळते, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. इच्छुकांनी महासभेचा अजेंडा निघाल्यापासूनच मोर्चेबांधणीला सुरूवात केली होती. काँग्रेसचे नेते आमदार पतंगराव कदम, जयश्रीताई मदन पाटील व विश्वजित कदम यांच्याकडे निवडीचे सर्वाधिकार आहेत. त्यामुळे इच्छुकांनी या नेत्यांना साकडे घातले आहे. दरम्यान, पतंगराव कदम यांनी शनिवारी सायंकाळी अस्मिता बंगल्यावर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत नव्या सदस्यांसह सभापती पदाबाबतही चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी दिवसभर काँग्रेसमधील इच्छुकांनी जयश्रीताई पाटील यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. मिरजेचे नगरसेवक निरंजन आवटी यांनी श्रीमती पाटील यांची भेट घेतली. त्याशिवाय दिलीप पाटील, शिवाजी दुर्वे, माजी उपमहापौर प्रशांत मजलेकर, प्रशांत पाटील, शेवंता वाघमारे यांच्यासह अनेकांनी विजय बंगल्यावर गर्दी केली होती.३१ आॅगस्ट रोजी काँग्रेस नगरसेवकांची बैठक घेणार असल्याचे श्रीमती पाटील यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)उपमहापौर : गटाला दणकास्थायी समिती सदस्य निवडीत उपमहापौर गटाला दणका बसणार आहे. या गटातील एकाही सदस्याला संधी मिळण्याची शक्यता धुसर आहे. पतंगराव कदम यांनीही शनिवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीला महापौर हारूण शिकलगार, स्थायी समिती सभापती संतोष पाटील, गटनेते किशोर जामदार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. पण उपमहापौर विजय घाडगे व त्यांच्या गटातील नेत्यांना मात्र या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले आहे.
स्थायी निवडीबाबत खलबते
By admin | Published: August 26, 2016 11:27 PM