सांगली : गेल्या साडेतीन महिन्यांपासून शहरातील बाजारपेठ ठप्प आहे. शहरात कोरोनाचा पाॅझिटिव्हीटी दर कमी असतानाही व्यवसाय सुरू करण्यास परवागनी दिली जात नाही. प्रशासनाच्या या धोरणामुळे व्यापार उद्ध्वस्त होत असून येत्या शुक्रवारी (दि. २३) सर्वच दुकाने उघडणार असल्याचे व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी सांगितले.
महापालिका क्षेत्रातील व्यापार, व्यवसाय सुरू करण्यावर संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे प्रशासनविरूद्ध व्यापारी असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत व्यापारी एकता असोसिएशनच्या सदस्यांची बैठक झाली.
शहा म्हणाले की, जिल्ह्यातील बाजारपेठ सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून कसलेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. खोटी वचने देऊन प्रशासन चुकीची धोरणे राबवत आहे. सांगलीतील व्यापाऱ्यांनी आतापर्यंत संयमाने प्रशासनास सहकार्य केले. पण प्रशासनाने बंदचे आदेश काढणे आणि दंड वसुली करण्याव्यतिरिक्त काहीही केलेले नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचा संयम संपला आहे. व्यवसाय बंद असल्याने अनेकांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. त्यात शासनाने कसलीही मदत केलेली नाही. आणखी किती दिवस व्यवसाय बंद ठेवायचा, असा प्रश्न आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी २३ पासून दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्वच संघटनांशी चर्चा सुरू आहे. मिरज व कुपवाडमधील व्यापाऱ्यांशीही चर्चा करणार आहोत. राजकारण बाजूला ठेवून प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुकाने उघडण्यास मदत करा.