लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमधून शिथिलता मिळताच शहरातील बाजारपेठेत नियमांना हरताळ फासला गेला आहे. केवळ जीवनावश्यक साहित्याची दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी असताना अत्यावश्यक सदरात न मोडणारी दुकानेही सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे निर्बंधांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने महसूल, पोलीस आणि महापालिकेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एप्रिल महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कडक लाॅकडाऊन जाहीर केला. कडक निर्बंधातून केवळ वैद्यकीय सेवा व औषध दुकानांना वगळले होते. भाजीपाला, किराणासह सर्वच दुकाने बंद करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर १ जूनपासून काही अटी-शर्तींसह अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. नवीन निर्बंधांनुसार भाजीपाला, फळ, किराणासह काही दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू झाली; पण गेल्या दोन दिवसांत शहरात अत्यावश्यक सेवेतील दुकानासह अत्यावश्यक सदरात न मोडणारी दुकानेही सुरू झाली आहेत.
शहरातील मारुती रोड, स्टेशन रोड, हरभट रोड, कापडपेठ या मुख्य बाजारपेठेतील अनेक दुकाने सकाळच्या टप्प्यात उघडली जात आहेत. त्यात कपडे, चप्पल, घड्याळे, मोबाइल, विविध साहित्यांसह दुरुस्ती करणाऱ्या दुकानांचा समावेश आहे. सकाळी पोलीस व महापालिकेकडून फारशी तपासणी केली जात नाही. त्याचा गैरफायदा दुकानदार घेत आहेत. टिंबर एरियातील फर्निचर व इतर साहित्यांची चोरी-छुपे विक्री सुरू आहे. मोबाइल दुकानदारांसह इतर दुकानेही अर्धे शटर उघडून सुरू झाली आहेत. या साऱ्या दुकानदारांनी कोरोना नियमांना धाब्यावर बसविले आहे. नियमांची अंमलबजावणी करणारी महसूल, पोलीस व महापालिकेची यंत्रणा सकाळी अकरापर्यंत कुठेच रस्त्यावर दिसत नाही. अकरानंतर या यंत्रणेला जाग येते, दिवसभरात एखाद्दुसरी कारवाई करण्यातच शासकीय यंत्रणेने धन्यता मानली आहे. त्यामुळे भविष्यात शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे.
चौकट
अशी होते चोरून विक्री
दुकानदारांनी सकाळी चोरी-छुपे दुकाने उघडून माल विक्री सुरू केली आहे. बाजारपेठेत सकाळी प्रत्येक दुकानासमोर तीन ते चार जण थांबलेले असतात. दुकानाचे शटर बंद असले तरी ग्राहक येताच ते उघडून त्याला दुकानात घेतले जाते. पुन्हा शटर बंद केले जाते. शासकीय यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी दोन ते तीन कामगार दुकानाबाहेरच असतात. वास्तविक अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद असतील तर बाजारपेठेत दुकानासमोर सकाळी गर्दी करून कामगार का थांबलेले असतात, याचे उत्तर शोधल्यास हा खेळ शासकीय यंत्रणेच्या लक्षात येईल.