आष्टा : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मुद्रांक विक्रेत्यांकडून नागरिकांना मुद्रांक उपलब्ध होत नसल्याने याठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती आहे.
आष्टा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आष्टा शहरासह परिसरातील २८ गावांतील खरेदी-विक्रीचे तसेच विविध व्यवहार होत असतात. या ठिकाणी खरेदी-विक्रीचे इ. स्टॅम्पमुळे ऑनलाइन व्यवहार होत आहेत. विविध कामासाठी मुद्रांक विक्रेत्यांकडून नागरिकांना मुद्रांक मिळत असतात. ३१ मार्चपर्यंत सर्व नागरिकांना मुद्रांक मिळाले. मात्र त्यानंतर १ एप्रिलपासून सर्व मुद्रांक विक्रेत्यांनी मुद्रांक विक्रीच बंद केली आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना सांगली किंवा इस्लामपूर वडगाव येथे मुद्रांक खरेदीसाठी जावे लागत आहे.
शहरातील सुमारे सहा ते सात मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने नूतनीकरणासाठी दिलेले आहेत ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणे अपेक्षित होते. मात्र एप्रिल संपत आला तरीही या मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने नूतनीकरण झालेले नाहीत. यामुळे विक्रेत्यांकडून नागरिकांना मुद्रांक मिळत नसल्याने त्यांची बँक, पतसंस्था यासह शेतकरी व विद्यार्थी यांना विविध कामासाठी मुद्रांक उपलब्ध होत नसल्याने गैरसोय होत आहे. मुद्रांक लवकरात लवकर उपलब्ध व्हावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
चौकट :
आष्टा शहरातील सर्व मुद्रांक विक्रेत्यांनी परवाने नूतनीकरणासाठी दिलेले आहेत. आम्ही ते पोलीस प्रशासनाकडे माहितीसाठी पाठवले आहेत. मात्र तिथून अद्याप परवाने नूतनीकरणासाठी मंजुरी मिळाली नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. लवकरच पोलीस प्रशासनाकडून मंजुरी मिळेल.
- सुमित्रा कुरळे-पवार
दुय्यम निबंधक आष्टा