मुंबई, दि. २५ : सातारा जिल्ह्यातील वांग धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासकीय नियमानुसार जमिनींचे वाटप तातडीने करण्याचे निर्देश जलसंधारण राज्यमंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.पाटण तालुक्यातील वांग नदीवर मराठवाडी गावाजवळ बांधण्यात येणाऱ्या वांग धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात बैठकीचे आयोजन मंगळवारी मंत्रालयात करण्यात आले होते. यावेळी शिवतारे बोलत होते. या बैठकीस कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राम गोटे, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता विजय गोगले, साताऱ्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव, पुण्याचे पुनर्वसन विभागाचे उपायुक्त दीपक नलावडे, सांगलीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय सावंत, सांगलीचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी तुषार ठोंबरे, साताऱ्याच्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी आरती भोसले, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.शिवतारे म्हणाले की, सातारा व सांगली जिल्ह्यातील एकूण १९२२ प्रकल्पग्रस्तांपैकी १0४0 प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित प्रकल्पग्रस्तांसाठी शासनाच्या नियमानुसार जमीन उपलब्ध असून, ती तातडीने देण्यात यावी. वांग धरणाचे काम पूर्ण झाल्यावर हजारो शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध होणार असून हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
वांग धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तातडीने जमिनीचे वाटप करावे : विजय शिवतारे
By admin | Published: April 25, 2017 6:32 PM