इस्लामपूर : घरी बसून सरकार चालत नाही. राज्यातील महायुतीच्या डबल इंजिन सरकारने लोकाभिमुख कामे केली. शासन आपल्या दारी योजनेतून ४ कोटी ५० लाख जनतेपर्यंत विविध योजनांचे लाभ पोहचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये का, सोन्याचा चमचा घेऊन येणारच हवा का? असा सवाल मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.इस्लामपूर येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रम शुक्रवारी झाला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोेलते होते. पालकमंत्री सुरेश खाडे, उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार धैर्यशील माने, आमदार सुधीर गाडगीळ, सदाभाऊ खोत, माजीमंत्री अण्णासाहेब डांगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार,भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडीक, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, विक्रम पाटील, गौरव नायकवडी, समित कदम, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले.शिंदे म्हणाले, आम्ही राज्यकर्त्यांच्या हिताचे नाही तर जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. फडणवीस आणि मी शपथ घेतल्यानंतर पहिला निर्णय दुष्काळी जनतेसाठी दुष्काळी भागात पाणी वळवण्याचा घेतला. आतापर्यंत १५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणाऱ्या १२० सिंचन प्रकल्पांचे निर्णय घेतले. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान लवकरच देणार आहे.पालकमंत्री सुरेश खाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलिसप्रमुख संदीप घुगे, महापालिका आयुक्त सुनील पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब..महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब लावले होते. मग, उद्योग वाढणार कसे? असा सवाल उपस्थित करीत शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत देशात केलेल्या कारभारवर एकही आरोप झालेला नाही. राज्यात उद्योग व गुंतवणूक वाढविण्यासाठी अनुकूल वातावरण महायुती सरकारच्या काळात करण्यात आम्हाला यश आले.