लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : बिदाल, ता. माण या गावाने वॉटर कप जिंकण्याबरोबरच पाणीदार गाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे हातात घेतली आहेत. रविवारी या गावाने एका दिवसात २१० लुज बोल्डर श्रमदानातून बांधले आहेत. दरम्यान, यासाठी गाव तसेच परिसर व इतर ठिकाणाहून आलेल्या २,४७५ लोकांनी श्रमदान केले. दि. ८ एप्रिलपासून वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण बिदाल गाव एकवटले आहे. दररोज कोट्यवधी लिटरचा पाणीसाठा होत असणारे काम होत आहे. रोज नवनवीन कल्पना राबविणाऱ्या या गावाने एका दिवसात २०० लुज बोल्डर बांधण्यासाठी नियोजन केले होते. त्यानंतर सर्व ठिकाणचे सर्वेक्षण करून जागा निश्चित करण्यात आल्या. प्रत्येक लुज बोल्डरसाठी १० लोक व एक अनुभवी दगड जुळविणारा कारागीर देऊन नियोजन केले होते. यासाठी अगोदरच्या रात्री बैठक घेऊन कोणी कोणते काम करायचे ते ठरवण्यात आले. गावातील जेवढे लोक श्रमदानाला येथील त्यानुसार लुज बोल्डरची संख्या ठरली. यासाठी गावातील सर्व नोकरदार मंडळी, आजूबाजूच्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, फलटण येथील वैशाली शिंदे यांचा ४५ जणांचा ग्रुप, डॉक्टर, वाघजाई गणेश मंडळ यांनीही उपस्थिती लावली होती. ठरल्याप्रमाणे रविवार उजडला. त्यांनतर २०० लुज बोल्डरच्या कामाचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी ७ मोठे ग्रुप केले. एकूण २३८ लुज बोल्डरचे काम हाती घेतले. त्यामधील २१० लुज बोल्डर श्रमदानातून करण्यात आले. या कामामुळे एक नवा इतिहास रचला गेला. यासाठी गावातील व परिसरातील अशा २,४७५ लोकांनी यासाठी श्रमदान केले. माण तालुक्यात वॉटर कप स्पर्धेतील ३२ गावांत कामे सुरू असली तरी बिदाल गावाने सर्वात पुढे राहत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली आहेत. ग्रामस्थांनी वॉटर कप बरोबरच ‘मिनी वॉटर कप’ स्पर्धेसाठी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. शरद पवार भेट देणार...राज्यात या स्पर्धेत २,०६७ गावे उतरली आहेत. त्यापैकी १२६७ गावे सक्रिय आहेत. यामधील बिदाल हे गाव सर्वात मोठे असून, लोकसंख्या ६ हजारांच्या आसपास आहे. गेली ५० वर्षे गावात ग्रामपंचायत, सोसायटीची निवडणूक बिनविरोध होत आहे. सुशक्षिताच्या भरणा असणाऱ्या या गावात सुमारे १५० शिक्षक, १०० डॉक्टर, डझनभर क्लास वन अधिकारी, १५० अभियंते, ५० परदेशात लोक आहेत. गावचे क्षेत्रफळ २५०० हेक्टर असून, या क्षेत्रावर काम करण्याचे आव्हान सहज पेलले आहे. ‘वॉटर कप’ जिंकायचाच यासाठी वाटेल ते करण्याची तयारी गावकऱ्यांनी दाखवली आहे. विशेष म्हणजे, या कामाचे रोजचे शूटिंग ड्रोन कॅमेऱ्याने होते. दरम्यान, कामाच्या ठिकाणी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख येणार असल्याची माहिती बिदाल पाणी फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली.
दिवसात २५०० लोकांचे श्रमदान
By admin | Published: May 07, 2017 11:53 PM