सांगली : ‘जय गोमटेशा’, ‘बाहुबली स्वामी की जय’च्या जयघोषात सोमवारी श्रवणबेळगोळ येथे महामस्तकाभिषेक सोहळ्याची सांगता झाली. या महोत्सवात गेला महिनाभर विविध विभागात काम करणा-या सहा हजार स्वयंसेवकांना अभिषेकाचा मान देण्यात आला होता. मस्तकाभिषेक सोहळ्यात देश-विदेशातून आलेल्या ६५ लाख भाविकांनी भाग घेतला असून, सर्वांच्या सहकार्याने हा महोत्सव यशस्वी झाल्याचे चारुकीर्ती भट्टारक महास्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.श्रवणबेळगोळ येथे दर बारा वर्षांनी भगवान बाहुबली स्वामी यांच्या मूर्तीवर महामस्तकाभिषेक केला जातो. यंदा या महोत्सवाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. त्यासाठी गेली दोन वर्षे तयारी सुरू होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते महोत्सवाला प्रारंभ झाला. १६ फेब्रुवारीपर्यंत पंचकल्याण महोत्सव झाल्यानंतर १७ फेब्रुवारीपासून महामस्तकाभिषेकाला सुरुवात झाली. या काळात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यासह केंद्र व राज्यातील अनेक मंत्र्यांनी उपस्थिती लावली होती.सांगता समारंभासाठी सकाळी सात वाजल्यापासून विंध्यगिरी पर्वत स्वयंसेवकांच्या गर्दीने फुलून गेला होता. जय गोमटेशा, बाहुबली स्वामी की जय अशा घोषणा देत भाविक पर्वतावर जात होते. संपूर्ण परिसर केशरी रंगात न्हाऊन निघाला होता. सन्मती संस्कार मंच, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, वीर महिला परिषद, वीर सेवक मंडळ, जयपूर, चंदाबाबा ग्रुप आदींसह दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यातून विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सोहळ्यात सहभाग घेतला.१२ जून रोजी समारोप : चारुकीर्ती महाराजमहामस्तकाभिषेक सोहळ्याला देश-विदेशातील भाविकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. अपेक्षेपेक्षा जादा भाविक या सोहळ्यात सहभागी झाले.सुरुवात झाल्यापासून ६५ लाख लोकांनी भगवान बाहुबलींचे दर्शन घेतले. अजूनही भाविक अभिषेकासाठी येत आहेत. सोमवारी सोहळ्याची सांगता झाली तरी, १२ जून रोजी महोत्सवाचा समारोप होईल. तसेच यापुढे दर रविवारी अभिषेक होणार असल्याचे चारुकीर्ती भट्टारक स्वामी यांनी सांगितले.प्राकृत विद्यापीठाचे काम लवकरच सुरू होणार असून, त्यासाठी अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे सांगत सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाºया सर्वांचे त्यांनी आभार मानले.
श्रवणबेळगोळ महोत्सव : ‘जय गोमटेशा’च्या जयघोषात महामस्तकाभिषेकाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 3:03 AM