सांगली - बारा वर्षांनी होणा-या भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी श्रवणबेळगोळ (कर्नाटक) सज्ज झाले आहे. महामस्तकाभिषेक सोहळ्याला येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत असून, तब्बल १९ दिवस हा उत्सव चालणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी सोहळ्याची सांगता होईल. या सोहळ्यात देश-विदेशातून ३० लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांना निमंत्रण देण्यात आले आहे.आचार्य वर्धमानसागर महाराज यांच्या पावन सान्निध्यात व स्वतिश्री जगद्गुरू चारुकीर्ती भट्टारक महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा होत आहे. या महोत्सवासाठी एक लाख चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे. मुनी, आर्यिका, त्यागीगण यांच्या निवासासाठी त्यागीनगरची उभारणी करण्यात आली आहे. आचार्य वर्धमानसागर महाराज यांच्यासह २५० मुनी, आर्यिकांचे श्रवणबेळगोळ येथे आमगन झाले आहे. मुनींच्या प्रवचनासाठी स्वतंत्र हॉल तयार करण्यात आला आहे.महोत्सवासाठी दररोज ३० हजार भाविकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.भाविकांना मोफत भोजन देण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटकासह इतर राज्यातून शेकडो टन धान्य जमा झाले आहे.कलशनगर येथे दररोज १००८ कलशांचा अभिषेक होणार आहे. त्यासाठीची नावनोंदणी पूर्ण होत आली आहे. वयोवृद्ध, अपंग भाविकांसाठी बॅटरी रिक्षाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.चार मजली पहाडमहामस्तकाभिषेकासाठी विंध्यगिरी पर्वतावरील जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून चार मजली पहाड उभारण्यात आला आहे. पर्वतावर ये-जा करण्यासाठी दोन लिफ्ट व अभिषेक सामग्रीसाठी स्वतंत्र लिफ्टची सोय केली आाहे. दररोज सहा हजार लोक पहाडावर जाऊ शकतात. विंध्यगिरीच्या समोरील चंद्रगिरी पर्वतावर अडीच लाख भाविकांना महामस्तकाभिषेक पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.कर्नाटक सरकारने सोहळ्यासाठी १८५ कोटींचा निधी दिला आहे. त्यातील ८० कोटी रुपयांतून निवासव्यवस्था होईल, तर २० कोटी रुपये प्राकृत विद्यापीठासाठी दिले आहेत. उर्वरित निधीतून रस्ते, ड्रेनेज व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध केल्याचे महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव तथा सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांनी सांगितले.
श्रवणबेळगोळ बाहुबली महामस्तकाभिषेकासाठी सज्ज! ७ फेब्रुवारीपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 4:33 AM