लोकमत न्यूज नेटवर्कम्हसवड : ‘वॉटर कप’ स्पर्धेत सहभागी झालेले लोधवडे ग्रामस्थ गाव पाणीदार करण्यासाठी अहोरात्र झटत असताना याच गावात राहणाऱ्या कोमल माने व तुषार चोपडे या नियोजित वधूवरानेही गाव पाणीदार बनविण्याचा निर्धार केला. नियोजित वेळेनुसार सोमवारी (दि. २२) वधू व वरासह दोन्ही पक्षांकडील वऱ्हाडी मंडळी लोधवडेच्या माळरानावर एकत्र आली. या ठिकाणी हाती फावडे, कुदळ अन् घमेले घेऊन वधू-वरासह वऱ्हाडीमंडळींनी भर उन्हात श्रमदान केले. लोधवडेचे कोमल माने व तुषार चोपडे मंगळवारी (दि. २३) विवाहबंधनात अडकत आहेत. हे दोघेही लोधवडे येथे आजअखेर झालेली जलसंधारणाची कामे पाहत व करत लहानाचे मोठे झाले. ग्रामस्वच्छता असो वा जल, मृद संधारण या कामात ग्रामस्थांनी हिरिरीने घेतलेला सहभागही त्यांनी पाहिला आहे. या श्रमदानामुळेच दुष्काळावर मात करण्यात लोधवडेकरांनी यश मिळविले. त्यामुळेच आयुष्याच्या नवीन वळणावर प्रवेश करत असताना या दोघांनी लग्नापूर्वी श्रमदान करण्याचा निर्धार केला. या त्यांच्या निर्धाराला दोन्ही पक्षांकडील मंडळींनी पाठिंबा दिला.नियोजनानुसार सोमवारी (दि. २२) सकाळी सुतारकीच्या माळात ग्रामस्थांच्या सोबत श्रमदान करण्यासाठी नवरा-नवरीसह वऱ्हाडी मंडळीने हजेरी लावली. नवरदेव तुषार चोपडे यांनी हाती फावडे घेऊन माती भरण्यास सुरुवात केली. तर माती भरलेली घमेली वधू कोमल हिने बांधावर टाकली. तसेच बैलांच्या साह्याने शेतात नांगरही फिरवला. या दोघांबरोबरच सर्व वऱ्हाडी मंडळी बांध बंदिस्ती करण्यास सरसावली.
आधी श्रमदान..मग बांधणार रेशीमगाठ
By admin | Published: May 22, 2017 11:14 PM