अशोक पाटील -- इस्लामपूरशिराळा तालुक्यातील डोंगरी भागातील कार्यकर्त्यांना तिन्ही गटाचे नेते आश्वासन व पैशाच्या जोरावर नेहमीच गुंडाळत आले आहेत. या भागातील कार्यकर्तेही ‘खोबरं तिकडं चांगभलं’ करत वारंवार या पक्षातून त्या पक्षात कोलांटउड्या मारतात. ऐन दिवाळीत गुंडगेवाडी येथील ८ घरे जळून खाक झाली होती. त्यांना जिल्हा परिषदेच्या फंडातून घरकुल मंजूर झाली आहेत. याचे श्रेय लाटण्यासाठी भाजपचे जि. प. सदस्य रणधीर नाईक व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्यात चढाओढ लागली आहे. यामुळे जळीतग्रस्तांसह तेथील कार्यकर्त्यांची कुचेष्टाच सुरु आहे.शिराळा मतदारसंघात विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी तिन्ही गटात नेहमीच संघर्ष असतो. विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक मंत्री पदाच्या कुंपणावर आहेत. त्यामुळे शिराळ्यातील राजकीय हवा थोडी नरमच आहे. छोट्या-मोठ्या विकासकामांचा श्रेयवाद लाटण्यासाठी तिन्ही गटाचे नेते आणि त्यांचे पदाधिकारी मग्न असतात.विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे अलीकडील काळात माजी आमदार मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे सत्यजित देशमुख हे एकत्र आले आहेत. त्यांची समझोता एक्स्प्रेस सध्या सुसाट असली, तरी ती कोणत्या क्षणी रुळावरुन खाली येईल, याची शाश्वती नाही. सध्या तरी दोन भाऊ एकत्रित येऊन विकासकामांचे श्रेय लाटताना दिसत आहेत. त्यांच्यावर कडी करत भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, त्यांचे चिरंजीव जि. प. सदस्य रणधीर नाईक यांनीही विकासाचे श्रेय लाटण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिराळकरांसह कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत आहेत.दोन दिवसांपूर्वीच मानकरवाडी तलावात आलेल्या वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या पाण्याचे पूजन जि. प. सदस्य रणधीर नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. हे पाणी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या प्रयत्नामुळेच आल्याचे यावेळी रणधीर नाईक यांनी स्पष्ट केले. या पाणी पूजनाला काही तासच लोटतात तोच माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन वाकुर्डे योजनेचे पाणी करमजाई धरणातून मानकरवाडी तलावात आले. हे काम मी प्रयत्न करुन आणलेल्या निधीमुळेच झाल्याचे सांगत या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.गुंडगेवाडी येथील जळीतग्रस्तांना घरकुल मिळावे म्हणून माजी पं. स. सभापती हणमंतराव पाटील यांनी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर सत्यजित देशमुख आणि जि. प. सदस्या सुशिला नांगरे यांच्या प्रयत्नाने ही घरकुले मंजूर झाली आहेत. यामध्ये कोणीही राजकारण आणू नये. कोणत्याही परिस्थितीत जळीतग्रस्तांचा प्रश्न सुटण्यासाठी आमचा प्रयत्न राहील.- लिंबाजी पाटील, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, सांगली शिफारस कुणाची : श्रेय कुणाचे?गुंडगेवाडी येथील ८ जळीतग्रस्तांना जि. प. च्या निधीतून यशवंत घरकुल मंजूर झाले आहे. हा मतदार संघ रणधीर नाईक यांचा नसतानाही त्यांनी श्रेय लाटण्याच्या उद्देशाने प्रथम या घरकुल मंजुरीची घोषणा केली. याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच या मतदारसंघातील काँग्रेसच्या जि. प. सदस्या सुशिला नांगरे यांनी यशवंत घरकुल योजनेचा लाभ मी माझ्या स्वत:च्या शिफारशीने मिळवून दिला आहे. प्रत्येक कुटुंबास ७५ हजार रुपये मिळणार आहेत. ही गावे माझ्या मतदार संघातील असताना रणधीर नाईक यांना याबाबत बोलण्याचा काय अधिकार आहे, असा प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे. सुशिला नांगरे या सत्यजित देशमुख यांच्या कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या सांगण्यावरुन नांगरे यांनी रणधीर नाईक यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
शिराळ्यात श्रेयवादाचा फड...
By admin | Published: April 05, 2016 11:33 PM