लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : देशातील पहिले हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांच्या निधनाने सोमवारी सांगलीकर हळहळले. त्यांची कर्मभूमी कोल्हापूर असली तरी, सांगलीवरही त्यांचे विशेष प्रेम राहिले. येथील मल्ल, त्यांचे कुस्ती कौशल्य याप्रती त्यांना कौतुक वाटायचे. माजी आमदार संभाजी पवारांसह येथील मित्रपरिवाराकडे ते नेहमी येत असत. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर येथील कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या आठवणींचा पट उभा राहिला.
वज्रदेही हरिनाना पवार यांना खंचनाळे हे आदरस्थानी मानत होते. त्यामुळे त्यांचे पुत्र संभाजी पवार यांच्याशी त्यांची मैत्री होती. वयाने व कुस्ती क्षेत्रात ते त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असले तरी, त्यांनी या कुुंटुबाशी मैत्रीभाव जपला. संभाजी पवारांचे बंधू शिवाजीराव पवार यांच्याकडेही ते नेहमी येत असत. हिंदकेसरी मारुती माने यांच्याशीही त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांच्याशी नियोजित केलेली कुस्तीही दोनवेळा रद्द झाली. सांगलीत भोकरे उद्योग समूहाचे संचालक संजय भोकरे यांच्याकडे येऊन त्यांच्याशी कुस्ती क्षेत्राच्या भवितव्याची चर्चा ते करायचे. सांगलीत अनेक कुस्ती मैदानांना तसेच हरिनाना पवार यांच्या २ फेब्रुवारी १९९६ च्या सत्काराला तसेच संभाजी पवार यांच्या सत्कार कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती.
चौकट
मारुती मानेंना कुतूहल
मारुती माने यांच्या मनात नेहमीच खंचनाळे यांच्या खुराक व व्यायामाच्या पद्धतीबद्दल कुतूहल वाटायचे. एकदा माने म्हणाले की, अण्णा, तुमच्यासारखे कष्ट आम्हाला कधीच जमणार नाही.
कोट
राक्षसी वाटावे असा खुराक आणि तितकाच अजब व्यायाम यामुळे खंचनाळे हे कुस्ती क्षेत्रात ताऱ्याप्रमाणे चमकत राहिले. ते अपराजित राहिले. त्यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. इतके यश मिळूनही ते सामान्य माणसाप्रमाणे जगले. त्यांच्या आठवणी कुस्ती क्षेत्राच्या इतिहासात अजरामर राहतील.
- शंकर पुजारी, कुस्ती निवेदक
कोट
साहित्य रूपातून कुस्तीची माहिती नव्या पिढीसमोर येत असल्याबद्दल त्यांना समाधान वाटायचे. त्यामुळे त्यांनी अनेकदा मला प्रोत्साहन दिले. ते जेवढे कठोर वाटायचे, तितकेच ते प्रेमळ व दुसऱ्याप्रती आदरभाव बाळगणारे होते. त्यांना नुरा कुस्तीची चीड यायची. असे तत्त्वनिष्ठ, खेळाप्रती आयुष्य वाहिलेले, अपराजित व्यक्तिमत्त्व गेल्याने या क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
- गणेश मानुगडे, संस्थापक, कुस्ती मल्ल विद्या महासंघ