महालिंग सलगर ।कुपवाड : राज्य कामगार विमा महामंडळाकडून (इएसआयसी) महापालिका क्षेत्रालगतच्या औद्योगिक वसाहतीमधील कामगारांसाठी दिली जाणारी कुपवाड व सांगलीमधील अकरा खासगी रुग्णालयांची सेवा सध्या बंद आहे़ संबंधित रुग्णालयांना इएसआयसीकडून थकित बिले मिळालेली नाहीत. भरीस भर म्हणून महामंडळाच्या अखत्यारित संपूर्ण जिल्हा कार्यक्षेत्र घेण्याचे धोरण इएसआयसीने राबविले आहे़
जिल्ह्यात औद्योगिक विकास महामंडळाबरोबरच सहकारी औद्योगिक वसाहती, ग्रामीण भागातील विविध प्रकारचे उद्योग आणि खासगी क्षेत्रातील विविध व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या सुमारे वीस लाख कामगारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची नोंदणी राज्य कामगार विमा महामंडळाकडे (इएसआयसी) करण्यात आली आहे़ या नोंदणीकृत कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना इएसआयसीकडून चांगली वैद्यकीय सेवा पुरविण्याची तरतूद कायद्यात आहे़ सध्या नवीन तरतुदीनुसार व्यवस्थापन आणि कामगारांनी मिळून इएसआयसीकडे चार टक्के विम्याचा भरणा करण्याची सक्ती केली आहे़. व्यवस्थापनाने एक दिवस जरी हा विम्याचा भरणा भरण्यात दिरंगाई केली, तरी त्वरित कारवाई केली जाते़
त्यामुळे कामगारांना चांगल्या सुविधा मिळाव्यात या आशेने जिल्ह्यातील उद्योजक विलंब न करता विमा रकमेचा भरणा करतात़ इएसआयसीकडे विम्याच्या रकमेचा भरणा करूनही जिल्ह्यातील कुपवाड, मिरज, इस्लामपूर, कडेगाव, जत, कवठेमहांकाळ एमआयडीसींसह महापालिका क्षेत्रात कार्यरत वसाहतींमधील कामगारांना म्हणाव्या तशा सुविधा मिळत नाहीत.इएसआयसीने गाजावाजा करत सांगली आणि कुपवाडमधील ११ खासगी रुग्णालयांमध्ये कामगारांसाठी सेवा सुरू केली. मात्र त्यांची थकित बिले न मिळाल्याने त्यांनी कामगारांची सेवा बंद केली आहे. इएसआयसीच्या मर्जीतील काही रुग्णालयांतून कामगारांना सेवा मिळण्याऐवजी अपमानच पदरी पडत आहे, असा आरोप होत आहे़नवा आणि जुना वर्गवारी चुकीचीराज्य कामगार विमा महामंडळाने नवा जावईशोध लावला असून, यामध्ये एक महिन्याचा कालावधी गृहीत धरून जुना आणि नवा कामगार अशी अन्यायी वर्गवारी केली आहे़ त्यामुळे नवीन आयटीआय पूर्ण केलेली मुले आणि नव्याने काम करणारे होतकरू, गरीब कामगार यांना ‘मल्टिस्पेशालिटी’च्या सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे़ आयटीआयनंतर प्रशिक्षणासाठी घेतलेल्या कामगारांना महामंडळाने डावलले असून, गंभीर घटना घडल्यास जबाबदारी झटकण्यासाठी हा सर्व खटाटोप केला असल्याचा आरोप उद्योजक करत आहेत.
कार्यक्षेत्र वाढविल्याने ग्रामीण कामगार चिंतेतसांगली, कुपवाडमधील रुग्णालयांची यापूर्वीची थकित देणीही देण्यास इएसआयसीकडून टाळाटाळ केली जात आहे़ आता तर महामंडळाच्या अखत्यारित संपूर्ण जिल्हा कार्यक्षेत्र घेतले आहे़ त्यामुळे महापालिका क्षेत्रातील कामगारांचे हाल होत असताना ग्रामीण व तालुकास्तरावरील कामगारांची नोंदणी करून हे कामगारही इएसआयसीकडून भरडले जाणार असल्याचे कामगारांचे मत आहे़.
कामगार, कृष्णा व्हॅली चेंबर न्यायालयात जाणारराज्य कामगार विमा महामंडळ कामगारांकडून विम्याद्वारे कोट्यवधी रुपये गोळा करते़ मात्र, कामगारांना महामंडळाकडून सुविधा दिल्या जात नाहीत़ या अन्यायाविरोधात कृष्णा व्हॅली चेंबर वारंवार आवाज उठवत आली आहे़. तरीही इएसआयसी कामगारांना सुविधा आणि सन्मानाची वागणूक देत नाही़ याला वैतागून कृष्णा व्हॅली चेंबर आणि कामगार एकत्रित महामंडळ आणि खासगी विमा क्षेत्र यांच्यातील तफावतीप्रकरणी न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती कृष्णा व्हॅली चेंबरचे सचिव चंद्रकांत पाटील यांनी दिली़