तासगाव पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी शहरातील सर्व परिस्थितीचा आढावा घेतला.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता, शासनाने ब्रेक द चेनच्या नावाखाली पुन्हा एकदा अंशत: लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यापूर्वीच्या काळात तारीख, सेवेच्या नावाखाली किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळांची दुकाने, शेती औषध दुकाने, हार्डवेअर, गॅरेजसंदर्भातील सर्व व्यवहार सुरू होते. यामुळे नागरिक खरेदीच्या नावाखाली रस्त्यावर भटकत होते. रस्त्यावरची गर्दी कमी होत नव्हती. अपेक्षित परिणाम समोर येत नव्हता. रुग्णसंख्या कमी व्हायला तयार नव्हती. तासगाव तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येची दिवसाला शंभरी गाठायला सुरुवात केली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुन्हा एकदा सकाळी सात ते अकराच्या वेळेत सर्व व्यवहार बंद ठेवण्याची भूमिका घेतली आहे. नागरिकांनीही या शासनाच्या भूमिकेचे स्वागत करीत कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी नियमांचे पालन करण्याची भूमिका घेतली असल्याचे चित्र तासगावात पाहायला मिळाले. अकरानंतर शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद झाल्याचे दिसून आले. औषधाचे दुकान, दवाखाने आता सगळे व्यवहार ठप्प होते. दुकाने बंद असल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. नागरिकांनी आपल्या घरात बसणेच पसंत केले.