शिराळा : उच्च न्यायालयाने शिराळ्याच्या नागपंचमीवेळी जिवंत नागपूजेस बंदी घातल्याने शिराळावासीयांमध्ये नाराजी असून, तीन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र नागरिकांची कुचंबणा होऊ नये, यासाठी आज (शनिवारी) दुपारनंतर बंद मागे घेऊन व्यापारीवर्गास दुकाने सुरू करण्यास सांगण्यात आले. सकाळी अंबामाता मंदिरात नागदेवतेस महाअभिषेक घालण्यात आला. मंगळवार, दि. १५ जुलै रोजी उच्च न्यायालयाने जिवंत नागपूजा, नाग पकडणे, मिरवणूक काढणे यावर बंदी घातली. यामुळे दि. १६ जुलैपासून व्यापारी पेठ बंद ठेवण्यात आली होती. आज सकाळी नऊ वाजता विधिपूर्वक नागदेवतेस महाअभिषेक घालून नागपूजेस परवानगी मिळावी, पारंपरिक नागपंचमी साजरी व्हावी, असे साकडे घालण्यात आले.यावेळी ग्रामस्थांची बैठक झाली. व्यापारपेठ बंद असल्याने नागरिकांची कुचंबणा होत आहे. त्यामळे दुपारनंतर व्यापारपेठ उघडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी दस्तगीर आत्तार, माजी जि. प. सदस्य महादेव कदम, सुनील कवठेकर, केदार नलवडे, सागर नलवडे, उत्तम निकम, महेश पाटील, जुनेद मुल्ला, राम पाटील, अशोक गायकवाड, शिवाजी शिंदे, महादेव कुरणे, संतोष हिरुगडे, दिलीप कदम, नागमंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.नागपंचमीस गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी येथील गुरुवार पेठेत श्री जैन श्वेतांबर मंदिरात महिला मंडळाच्यावतीने पूजा व जप करण्यात आला. यावेळी रेखा ओसवाल, चांदणी शहा, रेश्मा शहा, आशा शहा, त्रिशला पारेख, लीना शहा, कलावतीबेन शहा, सीमा ओसवाल, विमला गांधी, लीना जैन, चंद्रा मेहता उपस्थित होत्या. (वार्ताहर)
शिराळ्यातील बंद अखेर मागे
By admin | Published: July 19, 2014 11:07 PM