ऑनलाइन लोकमत
इस्लामपूर, दि. 1- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी व राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील एकत्र येत असल्याचे संकेत बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुकीतच मिळाले होते. मात्र पुन्हा एकत्र येण्यासाठी दोघे मुहूर्त शोधत आहेत का? असा सवाल कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
खा. शेट्टी आणि खोत यांच्यामध्ये सध्या संघर्ष सुरू असून, भाजपासोबत राहायचे की संघटनेसोबत याविषयी निर्णय घेण्याबाबत शेट्टी यांनी खोत यांना ४ जुलैपर्यंतचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. याबाबत विचारले असता खोत म्हणाले की, मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे. वैचारिक संघर्षामध्ये चौकशी समिती नेमली जाते. मात्र ज्यांना व्यक्तिद्वेषाची लागण झाली आहे, त्यांना द्वेषातून निर्णय घेण्यासाठी त्रयस्थाची मदत घेण्याची गरजच काय?.
खा. शेट्टी व जयंत पाटील एकत्र येत आहेत का, या प्रश्नावर एकदम उसळून खोत म्हणाले की, बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुकीतच त्याचे संकेत मिळाले होते. मात्र पुन्हा एकत्र येण्यासाठी दोघे मुहूर्त शोधत आहेत का? राज्यातील शेतकºयांचे प्रश्न सुटत नाहीत, असा ठपका ठेवत वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी खा. शेट्टी यांच्याकडे राजीनामा दिल्याकडे लक्ष वेधल्यावर खोत म्हणाले की, तुपकर यांनी कोणाकडे राजीनामा दिला, याची माहिती नाही.
दिलेला राजीनामा मंजूर व्हावा, अशी अपेक्षा असेल तर सामान्यपणे हा राजीनामा मुख्यमंत्री अथवा राज्यपालांकडे द्यावा लागतो! शेवटी लोकशाहीत निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. ते म्हणाले की, आघाडी सरकारने पंधरा वर्षांत शेतक-यांची घोर निराशा केली होती. आता आमचे सरकार शेतक-यांच्या शिवाराच्या दिशेने जात आहे. ऊस उत्पादक शेतक-यांना न मागता २५० रुपये प्रतिटनाची एफआरपीमध्ये दिलेली वाढ सरकार शेतक-यांच्या बाजूचे आहे, असे दर्शवणारी आहे. राष्ट्रवादी, काँग्रेसची सत्ता गेल्याने त्यांच्या नेत्यांना काही काम नाही. रिकामे डोके सैतानाचे असते, हे त्यांच्या कृतीतून दिसत आहे.
राज्यातील शेतकºयांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देऊन खोत म्हणाले की, राज्यात सर्वत्र पाऊसमान चांगले आहे. धरणातील पाणी साठ्यातही वाढ होत आहे. राज्यात चांगला पाऊस पडावा, शेतक-यांच्या खळ्यावर धान्याच्या राशी फुलू देत, असे साकडे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाला घालणार आहे.