लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. सत्ताधारी गटाविरोधात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला बारगळण्याची शक्यता अधिक असून, तिरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत. सहा गटांत होणाऱ्या निवडणुकीत रोटेशन पद्धतीमुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
कारखाना कार्यक्षेत्रात कऱ्हाड, वाळवा व कडेगाव तालुक्यांतील १३० गावांचा समावेश होतो. मागील निवडणुकीत वडगाव हवेली-दुशेरे, काले-कार्वे, नेर्ले-तांबवे, रेठरे हरणाक्ष - बोरगाव, येडेमच्छिंद्र - वांगी व रेठरे बुद्रुक - शेणोली अशा सहा गटांत गावांची विभागणी होऊन मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यावेळी येडेमच्छिंद्र - वांगी व रेठरे बुद्रुक - शेणोली या दोन गटांत दोन-दोनच उमेदवार होते. उर्वरित गटात तीन-तीन उमेदवार होते.
यावेळी रोटेशनचा विचार करता पुढील दोन गटांत रोटेशन पडेल. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत. तेथे उमेदवारी देताना पॅनेलप्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांच्याविरोधात डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते या दोन माजी अध्यक्षांच्या महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्याची चर्चा होती. मात्र महाविकास आघाडीबाबत संस्थापक पॅनेलचे प्रमुख अविनाश मोहिते यांनी कोणत्याही परिस्थितीत इंद्रजित मोहिते यांच्याशी आघाडी होणार नसल्याचे जाहीर केले आहे, तर रयत पॅनेलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते यांनी मात्र याबाबत अजूनही मौन बाळगले आहे. डॉ. अतुल भोसले व अविनाश मोहिते यांनी वाळवा तालुक्यातून, तर डॉ. इंद्रजित मोहिते यांनी कऱ्हाड तालुक्यातून संपर्क दौरे सुरू केल्याने निवडणुकीची हवा तापू लागली आहे.
फोटो : डॉ. सुरेश भोसले, अविनाश मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते