कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील बहुचर्चित दारुबंदी प्रस्तावाबद्दल सत्ताधारी व विरोधी गटात एकमत न झाल्याने हा विषय गुंडाळला गेला आहे. या दारूबंदीवर दोन्ही गटाकडून काहीच बोलले जात नसल्याने ग्रामस्थांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. सत्ताधारी व विरोधकांच्या या अनोख्या प्रेमाची गावात रंगतदार चर्चा सुरू आहे.कासेगावात विरोधक प्रत्येक ग्रामसभेत याबाबत पोटतिडकीने बोलत आहेत. मध्यंतरी गावातील शेकडो महिलांच्या स्वाक्षरीचे दारुबंदीबाबतचे निवेदन सरपंच सौ. नंदाताई पाटील यांना दिले होते. परंतु त्यानंतर त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. विरोधकही शांतच आहेत. सत्ताधारी गटाकडून याबद्दल कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.दोन्ही गटाकडून हा विषय सोयीस्कररित्या टाळला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी व विरोधी गटात ‘फिलगुड’चे वातावरण निर्माण झाले आहे. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही गटांनी एकत्र प्रचार केला होता. विरोधकांच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित होऊ लागली आहे. त्यांनी सत्ताधारी गटाशी जुळवून घेतल्याचेही बोलले जात आहे. (वार्ताहर)सरपंचांकडून निराशाकासेगावच्या सरपंच सौ. नंदाताई पाटील या दारूबंदीबाबत आग्रही भूमिका घेतील अशी चर्चा होती. मात्र त्यांनीही निराशा केली आहे. त्यांचा कार्यकाल पूर्ण होण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी बाकी आहे. तोपर्यंत तरी त्या ठोस पावले उचलतील का?, असा सवाल विचारला जात आहे.
कासेगावातील दारुबंदीवर सत्ताधारी-विरोधकांची चुप्पी
By admin | Published: June 30, 2015 11:19 PM