दत्ता पाटीलतासगाव : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी तासगाव तालुक्यातील सर्व शिक्षक, अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आज, शनिवारी मूक मोर्चा काढला. या मूक मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आजच्या मोर्चाला तासगाव तालुक्यातील महिला कर्मचाऱ्यांचा प्रचंड सहभाग असल्याचे दिसून आले.शासनाने २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेतला, या निर्णयामुळे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. १४ मार्चपासून राज्यातील सर्व कर्मचारी बेमुदत संपावर असून तासगावमध्ये संपाला शंभर टक्के प्रतिसाद असल्याची माहिती संयोजकांनी दिली.तासगाव मधील सर्व प्राथमिक शाळा सोबतच सर्व सरकारी कार्यालये बंद असून याबाबत शासनाने लवकरच सकारात्मक तोडगा काढावा यासाठी शनिवारी मूक मोर्चाने कर्मचाऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी पंचायत समिती समोर झालेल्या सभेत, सर्व संघटना जुनी पेन्शन योजनेसाठी एकवटल्या असून पेन्शन योजनेचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.या मुकमोर्चाला तालुका सर्व संवर्गातील समन्वय समिती, महसूल विभागाचे कर्मचारी, आरोग्य विभागचे कर्मचारी, पंचायत समितीचे सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक, शिक्षक, माध्यमिक शिक्षक मोठ्या उपस्थित होते. यावेळी कक्ष अधिकारी, लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना, लेखा कर्मचारी संघटना, परिचर संघटना, विविध शिक्षक संघटना व नेते यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते.या मोर्चा बरोबरच ठिय्या आंदोलनाचे नियोजन शिक्षक, अधिकारी व कर्मचारी समन्वय संघटनेचे प्रकाश कांबळे, अविनाश गुरव, महादेव जंगम, राहुल कोळी, दीपक लोणीस्टे, नूतन परीट, नंदकुमार खराडे, स्नेहा मंडले, अर्जुन जाधव, चंद्रकांत पाटील, राजाराम कदम, दादासाहेब हजारे यांसोबतच सर्व संघटनांचे प्रतिनिधी करत आहेत.
जुन्या पेन्शनसाठी सांगलीतील तासगावात मूक मोर्चा, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 3:49 PM