वेल्थ पेजसाठी
अविनाश कोळी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : भारतीय तांदूळ उत्पादक, निर्यातदारांची कोरोनाच्या संकटकाळातही चांदी झाली आहे. बासमती तांदळाच्या निर्यातीत ५.३१ टक्के, तर बिगरबासमती तांदळाची १२२.६१ टक्के निर्यातवाढ नोंदली गेली आहे. येत्या दोन महिन्यांत आणखी उच्चांकी वाढ हाेण्याचा अंदाज ऑल इंडिया राईस एक्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना वर्तविला आहे.
भारतातून मोठ्या प्रमाणावर दरवर्षी बासमती व बिगरबासमती तांदळाची निर्यात होत असते. बासमती तांदळापैकी ८० टक्के माल मध्य-पूर्व देशात म्हणजेच, अरब राष्ट्रांमध्ये जात असतो. यातील अनेक देशांनी कोविड कायम राहण्याच्या भीतीने मागणीपेक्षा जास्त तांदळाची साठवणूक सुरू केली आहे. त्यामुळे मागणीत वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात डिसेंबरअखेर ३.८ मिलियन टन (३३,८०,६५४ टन) निर्यात झाली आहे. मार्चअखेर ती ४.५ मिलियन टनापर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
ऑल इंडिया राईस एक्सपोर्ट असोसिएशनचे कार्यकारी संचालक विनोद कौल यांनी 'लाेकमत'शी बोलताना सांगितले की, बासमतीपेक्षा बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीत यंदा उच्चांक नोंदला जाणार आहे. २०१९-२० मध्ये ५ मिलियन टन तांदूळ निर्यात झाला होता. चालू आर्थिक वर्षात जानेवारी २०२१ पर्यंत ९.६ मिलियन टन तांदळाची निर्यात झाली आहे. मार्चअखेर ही निर्यात १४ मिलियनपर्यंत जाऊ शकते.
थायलंड, व्हिएतनाम व पाकिस्तान या तांदूळ निर्यातदार व स्पर्धक देशांच्या तुलनेत भारतीय बिगर बासमती तांदळाचा दर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १०० डॉलरने कमी आहे. भारतातील ७० टक्के माल आफ्रिकन देशात जातो. ज्याठिकाणी दरांची मोठी स्पर्धा असते. त्यामुळे भारतीय तांदळाला मागणी अधिक आहे.
चौकट
निर्यात वाढत असताना देशांतर्गत बाजारात बिगरबासमती तांदळाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. येत्या काही महिन्यांत हे दर चढेच राहणार आहेत. इंधन दरवाढीचाही त्यावर परिणाम होत आहे.
कोट
देशात यंदा तांदळाचे उत्पादन चांगले झाले आहे. गेल्या काही वर्षांतील निर्यातीचा उच्चांक यंदा नोंदला जाईल. पुढील आर्थिक वर्षातही तांदळाच्या निर्यातीला अत्यंत चांगले वातावरण राहील.
-विनोद कौल, कार्यकारी संचालक, ऑल इंडिया राईस, एक्सपोर्ट, असोसिएशन, दिल्ली