सांगली : मिटकी (ता. आटपाडी) येथील हणमंतराव दगडू वाघमोडे या सराफास मारहाण करून लूटमारी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात गुंडाविरोधी पथकास यश आले आहे. टोळीतील तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी वाघमोडे यांच्याकडून लुटलेले सोने व चांदीचे दागिने असा दोन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.अटक केलेल्यांमध्ये मंजुनाथ रामू अर्पणे (वय ३०, रा. कोल्हापूर रेल्वे चाळ, मिरज), असिफ जॉनमहंमदखान (२३, दिल्ली, सध्या पिरजादे प्लॉट, मिरज) व मोईन असिफ नदाफ (२२, सांगली वेस, भिलवडे गल्ली, मिरज) यांचा समावेश आहे. हणमंत वाघमोडे यांचे मिरजेत माणिकनगरमध्ये सराफी दुकान आहे. सध्या ते यशवंतनगर (सांगली) येथे चिन्मय पार्कमध्ये राहतात. ते दररोज दुकान बंद करून जाताना सर्व दागिने घरी नेतात. १४ नोव्हेंबरला ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून दागिने घेऊन घरी निघाले होते. सांगली-मिरज रस्त्यावरील शासकीय धान्य गोदाम रस्त्यामार्गे येत असताना या तिघांना त्यांना अडविले. संशयितांनी त्यांना काठीने बेदम मारहाण करून त्यांच्याकडील दोन लाखांचे दागिने घेऊन पलायन केले होते. या घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी करून संशयितांचा शोध सुरू ठेवला होता. मात्र कोणतेही धागेदोरे मिळाले नव्हते. याप्रकरणी वाघमोडे यांनी मिरज शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. गुंडाविरोधी पथकास या टोळीच्या कारनाम्याची माहिती हाती लागली. संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या घरावर छापे टाकून हे दागिने जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)मंजुनाथ बनला टोळीचा ‘टिपर’सावंत म्हणाले, ही टोळी पहिल्यांदाच रेकॉर्डवर आली आहे. त्यांची कसून चौकशी करण्याची गरज आहे. यातील मंजुनाथ हा ‘टिपर’ आहे. त्यानेच अन्य दोन संशयितांना वाघमोडे यांच्याविषयी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी लुटीचा बेत आखला. यातील असिफ जॉनमहंमदखान हा दिल्लीचा आहे. त्याच्याविरुद्ध दिल्लीत काही गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.लूटमारीचा बेत यशस्वी झाल्यानंतर तिघांनीही दागिन्यांचे समान वाटणी केली होती. त्यांनी दागिने घरात लपवून ठेवले होते. ते विकण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. मात्र सांगली, मिरजेत दागिने विकले तर पोलिसांना संशय येईल, अशी त्यांना भिती होती. यासाठी ते शांत बसले होते.
मिरजेतील सराफ लूटमारीचा छडा
By admin | Published: December 04, 2014 11:27 PM