सांगली : शेतकऱ्यांच्या धान्याची दारू करायची आणि त्यांच्याच पोरांना पाजायची, असा प्रकार महाविकास आघाडी सरकाने सुरू केला आहे. किराणा स्टोअर्स, माॅलमधील वाईन विक्रीविरोधात आम्ही राज्यभर रस्त्यावरची लढाई लढणार आहोत, शिवाय न्यायालयातही दाद मागू. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना केव्हापासून शेती कळू लागली, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत लगावला.
पाटील म्हणाले की, राज्यात काँग्रेसची इतके वर्षे सत्ता होती, पण इतका भीषण निर्णय कधीच घेतला नाही. तरुण पिढी बरबाद करण्याचा हा डाव आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळणार असल्याचा जावईशोध आघाडी सरकारने लावला आहे. शेतकऱ्यांच्या धान्याची दारू करायची आणि त्यांच्याच पोरांना पाजायची, असा प्रकार होईल. नवाब मलिकांनी वाईन विक्रीची घोषणा केली. त्यांना शेतीतील केव्हापासून कळू लागले. कुणाच्या इंटरेस्टमुळे हा निर्णय घेतला, असा सवालही त्यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाने बारा आमदारांचे निलंबन घटनाबाह्य ठरवले. राज्यात घटना पायदळी तुडवली जात आहे. केवळ दारू विक्रीच नव्हे तर सरकार बरखास्त करण्यासाठी अनेक कारणे आहेत, असेही पाटील म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप कार्यकर्त्यांना मनोरुग्णांचे औषध पाठवले, त्यावर पाटील म्हणाले की, माणूस स्वत: मनोरुग्ण झाला की त्याला आपण कसले औषध पाठवतो, हे कळत नाही. त्यामुळे ते पटोले काहीही करत असतात.
शिवसेना - काँग्रेसला राष्ट्रवादी खाणार
राष्ट्रवादीने काँग्रेस व शिवसेनेचे अनेक नेते पळवले. मालेगावातील नगरसेवकांचा मोठा गट पक्षात घेतला. शिवसेना व काँग्रेसला हे सारे कळते आहे. फोडाफोडी करण्यात जयंत पाटील प्रसिद्ध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना खाल्ल्याशिवाय राहणार नाही, असे भाकीतही पाटील यांनी केले.