सांगली : गेल्या आठवड्यात सांगलीकरांना दर्शन देऊन घाम फोडणारा गवा पद्माळे (ता. मिरज) येथे शिरला आहे. गावातील ओढ्यालगत त्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभाग मात्र, त्याचा शोध सुरू असल्याचेच सांगत आहे. पण प्रत्यक्षात गव्याच्या पावलांच्या ठशांचा शोध घेण्यापलीकडे त्यांंनी काहीच केलेले नाही.
गेल्या आठवड्यात शनिवारी सुखवाडी (ता. पलूस) येथे गव्याचे दर्शन झाले होते. दुसºयादिवशी हा गवा नदीकाठावरुन रात्री साडेदहा वाजता सांगलीत घुसला होता. येथील स्वामी समर्थ घाटावरुन पांजरपोळमार्गे तो थेट टिळक चौकात आला. तेथून त्याने हरभट रस्ता, गवळी गल्ली परिसरात अनेकांना दर्शन दिले. काहींना म्हैस असल्याचे वाटले. पण गवळी गल्लीतील काही तरुणांना तो गवा असल्याचे लक्षात आले. गव्याला हुसकावून लावण्यासाठी त्याचा पाठलाग केला. पुढे गवा आलेल्या मार्गाने पुन्हा स्वामी समर्थ घाटावर गेला. तेथून तो बायपास रस्त्याकडे गेला. त्यानंतर तो पुन्हा दिसला नाही. नदीकाठी, बायपास रस्त्यावरील शेतातील पाऊलवाटांवर गव्याच्या पावलांचे ठसे मिळाले. यावरुन तो कर्नाळकडे गेल्याचे स्पष्ट झाले होते. सांगलीत तो पुन्हा येईल, या भीतीने नदीकाठचे रहिवासी अजूनही सतर्क आहेत.
कर्नाळमधून हा गवा आता जवळच असलेल्या पद्माळे गावात घुसला आहे. गावातील ओढ्यालगत ग्रामस्थांना त्याचे दर्शन झाले आहे. काहींनी अगदी समोरुन त्याचे मोबाईलवर छायाचित्रही घेतले आहे. दिवसभर हा गवा उसातील शेतात बसतो, रात्रीच्यावेळी तो बाहेर पडतो, असे ग्रामस्थांनी सांगितले. वन विभागाला याची माहिती मिळताच एक पथक तातडीने रवाना झाले होते. पण त्यांनी गव्याच्या पायाचे ठसे घेण्यापलीकडे काहीच केले नाही. गेल्या चार दिवसांपासून गव्याचे सातत्याने दर्शन होऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.म्हैशीवर हल्ल्याचा प्रयत्नपद्माळेतील शिंदे मळ्यात जनावरांचा गोठा आहे. दोन दिवसांपूर्वी या गव्याने गोठ्यातील एका म्हैशीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. म्हैशीबरोबर त्याची जोरदार झटापट झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दिवसभर हा गवा लपून बसतो आणि रात्रीच्यावेळी तो बाहेर पडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र वन विभाग रात्रीच्यावेळी गव्याला पकडण्यासाठी कोणतेच प्रयत्न करताना दिसत नाही.