सांगली : सांगलीच्या मातीत घडलेल्या कर्तृत्ववान माणसांनी आपल्या कामाचा ठसा नेहमीच उमटविला आहे. मग तो कोणत्याही क्षेत्रात असो अथवा कोणत्याही प्रदेशात. आपलं वेगळपण या मातीने नेहमीच जपले आणि ते वेगळेपण इथल्या माणसांमध्ये रुजविले आहे. याची साक्ष मिळते, ती इस्लामपूर येथील मूळचे रहिवासी असणारे व सध्या आंध्र प्रदेशमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले सुमित गरुड यांच्यामुळे. एका बाजूला आपल्या अधिकाराने गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी धडाकेबाज सिंघम अधिकारी, तर दुसऱ्या बाजूला आपल्या सहकाऱ्यांविषयी अनोखे उपक्रम राबवून जबाबदार नेतृत्वाची भूमिका बजाविणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख बनली आहे.
दहावीत ९५.०६ टक्के गुणांनी कोल्हापूर विभागात प्रथम; बारावीत ९६ टक्के गुणांसह बोर्डात सहावा; मुंबई विद्यापीठातून एमबीबीएसची पदवी तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण आणि २०१५ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिसऱ्या प्रयत्नांत यश संपादन करीत आयपीएस होण्याचा मान. असा हा शैक्षणिक प्रवास संपल्यानंतर सुमित गरुड यांनी आपल्या भारतीय प्रशासकीय सेवेला आंध्र प्रदेशमधून सुरुवात केली. विजयनगरम्, विशाखापट्टणम् येथे सेवा बजावत सध्या ते काकीनाडा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
आंध्र प्रदेशमध्ये अवैध वाळू उपसा आणि दारू व्यवसायाला चाप लावण्यासाठी तेथील सरकारने मोजक्याच अधिकाऱ्यांवर विशेष मोहीम राबविली आहे. या अधिकाऱ्यांमध्ये सुमित गरुड यांची निवड करण्यात आली आहे. धडाकेबाज कामगिरी, रोखठोक भूमिका यामुळे गरुड यांनी आंध्र प्रदेश पोलीस प्रशासनात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. यामुळेच या मोहिमेमध्ये त्यांना संधी मिळाली आहे. गत काही दिवसांमध्ये त्यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये स्वत:ची जरब निर्माण केली आहे.
या कामगिरीबरोबरच त्यांनी पोलीस प्रशासनातील महिला कर्मचाऱ्यांसाठीही विशेष उपक्रम राबवत, त्यांच्या समस्या सोडविण्याचे काम केले आहे. ‘वनिता वनी’ या नावाने हा उपक्रम असून, याअंतर्गत महिला कर्मचाऱ्यांच्या कामातील विविध समस्या, काैटुंबिक अडचणी, शारीरिक समस्या याविषयी मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यावर भर दिला आहे. या माध्यमातून त्यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठीही पाऊल उचलले आहे.