विकास शहाशिराळा : रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणासाठी पवित्र धागा बांधणे. बहिणीनेच आपल्या धाकट्या भावाला स्वतःची किडनी देऊन जीवनदान देऊन एक आगळेवेगळे रक्षाबंधन साजरे केले. शिराळ्यातील सुजाता संदीप उबाळे या बहिणीने धाकटा भाऊ धनाजी गायकवाड यास स्वतःची किडनी देऊन जीवदान दिले व समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.आनंदराव गायकवाड यांचे कुटुंब पत्नी संजीवनी, सुरेखा देशमुख, सीमा चव्हाण, सुजाता उबाळे या तीन मुली, धनाजी एक मुलगा. बेताची परिस्थिती पानपट्टीचे छोटे दुकान. यावर उदरनिर्वाह सुरू होता आणि या कुटुंबाला जणू नजर लागली म्हटले तर वावगे ठरणार नाही. २०१७मध्ये आनंदराव यांना हृदयविकाराचा झटका आला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा धनाजी याच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पडली. त्यामुळे एक दोन गुणांनी स्पर्धा परीक्षेचे यश हुकले. याचवर्षी धनाजीस सर्दी खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्याच्या दोन्ही किडन्या पन्नास टक्के काम करत नसल्याचे आढळून आले. आता किडनी बद्दलण्याशिवाय पर्याय नव्हता. सुरुवातीला आई किडनी देण्यास तयार झाल्या. मात्र, वयाच्या अडचणीमुळे त्या किडनी देऊ शकल्या नाहीत. यावेळी वडील आनंदराव यांनी शिराळ्यातील धाकटी मुलगी सुजाता उर्फ चांदणी (वय, ३६) यांना याबाबत विचारले. यावेळी भावासाठी किडनी देण्यास त्या तयार झाल्या. मात्र, ४ एप्रिल २०२४ रोजी आनंदराव यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. यानंतर या दुःखातून सावरत ८ ऑगस्टला किडनी देण्याची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. यानुसार धनाजी (वय ३५) व सुजाता यांना डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, पुणे येथे दि. १५ जुलै रोजी दाखल केले. दि. ८ रोजी डॉ. वृषाली पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली.
विविध मान्यवरांचे सहकार्यबहीण भावाला किडनी देऊन रक्षाबंधन साजरी करणार आहे. यासाठी त्यांना आमदार मानसिंगराव नाईक, डी वाय पाटील विद्यापीठाचे पी.डी. पाटील, ॲड. प्रमोद पाटील, प्रशांत पाटील, संदीप उबाळे, मंदार उबाळे, राहुल गायकवाड, संतोष देशपांडे, प्रवीण थोरात, अमोल चव्हाण यांचे सहकार्य लाभले. शिराळा येथील रमेश सोनटक्के यांनी आपला भाऊ अशोक सोनटक्के यांना काही वर्षांपूर्वी किडनी देऊन जीवदान दिले होते.