तासगाव : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा बहिणीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार डोंगरसोनी (ता. तासगाव) येथे सोमवारी उजेडात आला. रमेश बाळासाहेब झांबरे (वय ३०) असे खून झालेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी सुधाकर तानाजी झांबरे (३८, डोंगरसोनी) व सारिका संपत पाटील (३२, वडगाव, ता. तासगाव) यांना अटक केली आहे.न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मोबाईलवरील कॉल रेकॉर्डिंगमुळे, खुनाच्या घटनेनंतर दहा दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला.सारिका पाटील ही मृत रमेश झांबरेची सख्खी बहीण आहे. तिचा वडगाव येथील संपत पाटील याच्याशी विवाह झाला आहे. तिच्या वडिलांची डोंगरसोनीत द्राक्षबाग आहे. द्राक्षबागेत कामानिमित्त ती नेहमी माहेरी येत असे. पत्नी नेहमी माहेरी का जाते? याबद्दल तिच्या पतीला संशय येत असे. दरम्यान, सारिकाचे सुधाकर झांबरे याच्याशी अनैतिक संबंध होते. या संबंधाची गावात चर्चाही सुरु झाली.याची कुणकुण सारिकाचा भाऊ रमेशला लागली. त्याने सारिकाला याचा जाब विचारला होता. यातून दोघांत कडाक्याचे भांडण झाले होते. रमेशने सारिकाला, ‘परत काही कानावर आले तर बघ’, असे सांगून चांगलीच ताकीद केली होती. हा प्रकार सारिकाने तिचा प्रियकर सुधाकर यास सांगितला. आपल्या प्रेमसंबंधात रमेश हा अडथळा ठरत असल्याचे तिने सांगितले. भावाचा अडथळा होऊ नये, इतरांना याचा सुगावा लागू नये, म्हणून सारिका व सुधाकरने रमेशच्या खुनाचा कट रचला.खुनाच्या दोन दिवस अगोदर सुधाकर झांबरे, रमेशला घेऊन जेवणासाठी ढाब्यावर गेला होता. रमेशला दारूचे व्यसन होते. त्याला त्याने दारू पाजली व परत जाताना डोक्यात जड वस्तूने हल्ला केला. अचानक झालेला हल्ला व डोक्यावर जोरदार घाव बसल्याने रमेशचा जागीच मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह डोंगरसोनी-वाघोली रस्त्यावरच टाकून सुधाकर झांबरे पसार झाला होता.दि. ७ सप्टेंबरला वाघोली येथे रस्त्याकडेला रमेश ज्ञानोबा झांबरे यांच्या शेतात रमेशचा मृतदेह सापडला. दारूच्या नशेत मार लागून त्याचा मृत्यू झाला असावा, असा नातेवाईकांचासमज झाला. तासगाव पोलिसात ‘अपघाती मृत्यू’ अशी नोंदही झाली होती. डोक्याला गंभीर मार लागून मृत्यू झाल्याचा उत्तरीय तपासणीचा अहवाल आला होता.याप्रकरणी तासगाव पोलिसात नोंद झाली असून निरीक्षक अजय सिंदकर तपास करत आहेत.संभाषणामुळे लागला छडामात्र रविवारी दशक्रिया विधीवेळी सारिकाच्या मोबाईलमधील संशयास्पद संभाषण पोलिसांच्या हाती लागले. या संभाषणावरून सारिका आणि सुधाकरला पोलिसांनी अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. याबाबत मृत रमेश याचा चुलतभाऊ ज्ञानेश्वर ऊर्फ दीपक लालासाहेब झांबरे याने पोलिसांत फिर्याद दिली असून न्यायालयाने दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.दहा दिवसांनंतर उलगडादारूच्या नशेत मार लागून रमेशचा मृत्यू झाला असेल, असा नातेवाईकांचा समज होता. मात्र मृत्यूनंतर गावात, रमेशची बहीण सारिका आणि सुधाकरनेच अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने रमेशचा काटा काढल्याची चर्चा सुरु होती. दरम्यान, भावाच्या मृत्यूनंतर सारिकाही माहेरीच राहिली होती. घरी दु:खाचा प्रसंग असतानादेखील सारिका सातत्याने मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होती. यावरून अन्य नातेवाईकांना संशय आला. काही नातेवाईकांनी १६ तारखेला दशक्रिया विधीसाठी भटजीला फोन करायचा आहे, असे सांगून सारिकाचा मोबाईल काढून घेतला. या मोबाईलमध्येच खुनाच्या अनुषंगाने संशयास्पद संभाषण सापडले. या संभाषणावरूनच दहा दिवसानंतर खुनाचा उलगडा झाला.
डोंगरसोनीत बहिणीकडून भावाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:10 AM