सांगली-जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. याविरोधात सांगलीजिल्हाधिकारी कार्यालयासमोर रयत क्रांती संघटना आणि भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर सर्व कार्यकर्त्यांनी जेवण करून आंदोलन केले.
आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, राहुल महाडिक यांनी निदर्शनाचे नेतृत्व केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर बसून घोषणा देत सरकारच्या आरोग्य यंत्रणेचा धिक्कार केला.
यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार चले जावच्या घोषणा दिल्या. कोरोनाच्या आजारातून आमदार सदाभाऊ खोत नुकतेच बाहेर पडले आहेत. १० दिवस त्यांनी घरी राहून उपचार घेतले. २ दिवसांपूर्वीच त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. डॉक्टरांनी त्यांना आणखी ४ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला होता. पण सांगली जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष भास्कर कदम, डी.के.पाटील, विनायक जाधव, कपिल ओसवाल, सतीश महाडिक, किरण उथळे, लालसो धुमाळ, अरुण गावडे, सुनील सावंत, शशिकांत शेळके, अमोल पडळकर, जयवंत पाटील, बजरंग भोसले, डॉ.सचिन पाटील, आकाश राणे, मोहसीन पटवेकर, सर्फराज डाके, अल्ताफ मुल्ला, दिलीप माणगावे, राकेश भोसले, पांडुरंग बसुगडे, संदीप पाटोळे, स्वप्नील लोहार, विकास यादव, दादा मेंगाणे, संतोष पाटील, ओंकार पाटील, दशरथ खोत, सत्यजित कदम, उल्हास कदम, बबन वाघमोडे, प्रकाश कोळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांना गेटवरच अडवले
यावेळी पोलीसांनी आमदार सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांना गेटवरच अडवल्याने दोघांनी कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावरच ठाण मांडून सरकारच्या ढिसाळ नियोजनाचा धिक्कार केला. नंतर जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले व त्या तात्काळ पूर्ण करण्याची विनंती केली.
आंदोलनातील प्रमुख मागण्या ◆ खाजगी दवाखाने नॉन कोविड रुग्णाला दवाखान्यात भरती करून घेत नाहीत व रुग्णाची कोरोना टेस्ट करून रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही उपचार करणार नाही या आडमुठ्या भूमिकेमुळे अनेक रुग्णांचे जीव जात आहेत.◆ हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजनचा तुटवडा व व्हेंटिलेटरची कमतरता असल्यामुळे अनेक रुग्ण दगावत आहेत तरी ऑक्सीजन व व्हेंटिलेटर उपलब्ध करावे.◆ रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत तरी त्यांना तात्काळ बेड उपलब्ध करून मिळावेत.◆ नॉन कोविड तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा गावागावात उभा करावी किंवा जिल्ह्यातील सगळेच १००% कोविड रुग्ण आहेत असे सरकारने जाहीर करावे.◆ जिल्ह्यातील सर्व सिटी स्कॅन सेंटर २४ तास सुरू राहावेत.◆ प्रत्येक तालुक्यात आरोग्य यंत्रणेत समन्वय साधण्यासाठी कक्ष स्थापन करावे.◆ प्रत्येक हॉस्पिटलला रॅपिड अँन्टीजन किट विनाअट वापरणेस परवानगी घ्यावी.◆ प्रत्येक सरकारी व खाजगी कोविड सेंटरला लागणारी पी.पी.ई किट सरकारने उपलब्ध करून द्यावी.◆ कोविड सेंटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका पोहचलेस विनाअट कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी सेवेत सामावून घ्यावे.◆ प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सीजन व व्हेंटिलेटरची सोय करण्यात यावी.◆ पुणे येथील पत्रकार पांडुरंग रायकर यांच्यावर उपचार करणेस हलगर्जीपणा केला त्याचेवर ३०२ अंतर्गत गुन्हा नोंद व्हावा.◆ रुग्णाच्या स्वँबचा रिपोर्ट किमान १२ तासाच्या आत उपलब्ध करून घ्यावा.