शेगाव : आजच जतसाठी १०० ऑक्सिजन बेडच्या खरेदीसाठी मंजुरी दिली आहे. त्यानुसार जत येथील समाजकल्याण मुलींच्या वसतिगृहाची जागा कोविड रुग्णालयासाठी निश्चित केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार दिली.
जत येथे १०० ऑक्सिजन बेड व ५ व्हेंटिलेटरचे रुग्णालय उभा करावे, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती. मंत्री पाटील यांनी तातडीने मान्यता दिली. त्यानुसार चंद्रकांत गुडेवार यांनी कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासंदर्भात मंगळवारी जत येथे जागेची पाहणी केली.
तत्पूर्वी जत पंचायत समितीच्या सभागृहात गुडेवार यांनी तालुक्यातील कोविडबाबत आढावा घेतला. यावेळी आमदार विक्रम सावंत, प्रांताधिकारी प्रशांत आवटे, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, सभापती मनोज जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर, तम्मणगौडा रवी-पाटील, सुनील पवार, उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार, उत्तमशेठ चव्हाण, बाबासाहेब कोडग, नाना शिंदे, युवराज निकम, आण्णा भिसे, गौतम ऐवळे आदी उपस्थित होते.
चंद्रकांत गुडेवार म्हणाले की, जत येथ उभारण्यात येणाऱ्या कोविड रुग्णालयात पहिले आठ दिवस रुग्णांच्या उपचारासाठी स्थानिक डॉक्टर, परिचारिका यांची व्यवस्था करावी. यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घ्यावी. त्यानंतर कायमस्वरूपी निर्णय घेऊ. शासनाकडून दिलेले व्हेंटिलेटर हॉस्पिटलमध्ये वापरात नसतील, तर ती परत घेऊन नव्याने उभारण्यात येणाऱ्या कोविड रुग्णालयासाठी वापरले जातील.