सांगली : येथील मुख्य बसस्थानकातून तासगावला जाण्यासाठी बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या पर्समधील सहा लाख ४८ हजारांचे दागिने चोरट्यांनी लांबविले. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी सुजाता दशरथ बंडगर (रा. सरस्वतीनगर, वासुंबे, ता. तासगाव) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वासुंबे येथील सुजाता बंडगर मुलासोबत इचलकरंजीला गेल्या होत्या. रविवारी सायंकाळी त्या इचलकरंजीमधून सांगलीत बसस्थानकावर आल्या. तेथून त्या तासगावला जाण्यासाठी सांगली - विटा बसमध्ये चढत होत्या. बसला गर्दी होती. प्रवासात अंगावर दागिने नकोत म्हणून बंडगर यांनी कापडी पिशवीत घालून ते टॉवेलमध्ये गुंडाळून पर्समध्ये ठेवले होते. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्या पर्समधून हातोहात हे दागिने चोरून नेले.
बसमध्ये बसल्यावर चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने शहर पोलिसात फिर्याद दाखल केली. शहर पोलीस परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून पुढील तपास करत आहेत.
चौकट
वारंवार चोरीच्या घटना
मध्यवर्ती बसस्थानकात बसमध्ये चढत असलेल्या प्रवाशांच्या पिशवीमधून दागिने लांबविण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यातील काहीजण तक्रार दाखल करतात, तर काहीजण टाळतात. रविवारी गर्दी असताना चोरट्यांनी तब्बल साडेसहा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे.