सांगली : जिल्हा परिषदेकडील घेतलेली कामे सहा महिन्यांत ठेकेदाराने पूर्ण केली नाहीत. या ठेकेदारांना नोटीस बजावूनही त्यांनी प्रशासनास दाद दिली नसल्यामुळे संबंधित पाच ठेकेदारांना पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी अभियंता, कर्मचाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना जितेंद्र डुडी बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, कार्यकारी अभियंता भारती बिराजे आदी उपस्थित होते.ठेकेदारांना कामे सुरू करण्याचे आदेश देऊन सहा ते सात महिन्यांचा कालावधी झाला आहे. तरीही ठेकेदारांनी कामे सुरू केली नाहीत. या सहा ठेकेदारांना कामे सुरू करण्याबाबत नोटीस बजावली होती. तरीही ठेकेदाराने कामे सुरू केली नाहीत. ठेकेदाराच्या चुकीमुळे जनतेची गैरसोय आणि शासकीय निधी अखर्चित राहत आहे. म्हणूनच ठेकेदारांच्या या चुकीबद्दल त्या ठेकेदारांना पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. याबाबतचे आदेशही त्यांनी कार्यकारी अभियंता भारती बिराजे यांना दिले आहेत.बांधकामाच्या गैरकारभारावर आता ऑनलाइन वॉच
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी यांनी पाणीपुरवठा योजनांच्या कामातील गैरव्यवहार थांबविण्यासाठी ‘वर्क मॉनिटरिंग सिस्टिम’ सुरू केली आहे. पाइपलाइन खुदाईपासून ते वापरलेल्या मालाच्या गुणवत्तेचे चित्रीकरण करून ते ऑनलाइन अपलोड करायचे आहे. यामुळे घोटाळेखोरांना चाप बसला आहे. हीच पद्धत रस्त्याचे काम, इमारत बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर चित्रीकरण करून ‘वर्क मॉनिटरिंग सिस्टिम’ या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे, असेही जितेंद्र डुडी यांनी सांगितले.