विटा : खानापूर मतदारसंघात मी सहावेळा निवडणूक लढविली. परंतु, मला पोलिस बंदोबस्त घेऊन फिरण्याची कधीही वेळ आली नाही, असा घणाघात शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी खा. संजयकाका पाटील यांच्यासह विरोधकांवर येथे पत्रकार परिषदेत केला. आटपाडीच्या नेत्यांना मी मदत केली असल्याने, त्यांच्या सर्व भानगडी माहीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
माझ्यावर चांगले संस्कार झाले आहेत. त्यामुळे मला मस्ती नाही. खानापूर मतदारसंघात जनतेने नाकारलेले सर्वजण एकत्रित येऊन, माझ्याबद्दल अधिकाऱ्यांवर दहशत माजविणाऱ्यांची मस्ती उतरविण्याची भाषा बोलत आहेत. परंतु, खासदारांच्या तोंडी मस्तीची भाषा शोभत नाही.
खानापूर मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून खा. संजयकाका पाटील, माजी आ. सदाशिवराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, भाजपचे गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांनी एका व्यासपीठावर एकत्रित येऊन आ. बाबर यांना लक्ष्य केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आ. बाबर यांनी प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले, सध्या तालुक्यात कोणतीही निवडणूक नसतानाही विविध पक्षांतील नेते एकत्र येऊन माझ्याविषयी संघर्षाची भाषा करीत आहेत. परंतु, जोपर्यंत जनता माझ्यासोबत आहे, तोपर्यंत जनतेने नाकारलेले अनेक नेते एकसंध झाले तरी मला काही फरक पडत नाही.
प्रशासकीय अधिकाऱ्यांवर माझी दहशत असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. परंतु, मी केलेली विकास कामे पाहून विरोधकांना माझी दहशत वाटू लागल्याने, ते एकत्रित येऊन माझी मस्ती काढायची भाषा वापरत आहेत. खासदारांच्या तोंडी मस्तीची भाषा अशोभनीय आहे. त्यामुळे त्यांना तसे वाटत असले तरी, त्यांनी मला वेळ व ठिकाण सांगावे, त्याठिकाणी मी एकटा येण्यास तयार आहे.
शिवसेना व भाजपचे सरकार सत्तेत आहे. विकास कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्री मला मदत करतात. ते मी जाहीरपणे सांगतो. त्याचे सर्व श्रेय मी भाजपलाच देतो. त्याचा पोटशूळ भाजपच्याच खासदारांना कशासाठी?
विरोधकांना टेंभूचे पाणी घाटमाथ्यावर येऊ नये व मी विधानसभेला उभा राहू नये, असे वाटत असावे. खासदारांनी किमान भाजप पक्षवाढीचे काम करावे. खानापूर तालुक्यात ज्यांना तुम्ही तुमच्यासोबत घेऊन फिरताय त्यांना (सदाशिवराव पाटील) एकदा तुमच्या पक्षात तरी घेऊन टाका, असा टोलाही अनिल बाबर यांनी यावेळी लगावला.
मी माझ्या मतदारसंघाच्या बाहेर जाऊन कधी राजकारण केले नाही. अजून तासगाव तालुक्यात राजकारणासाठी गेलो नाही. आटपाडीच्या नेत्यांना मी वेळोवेळी मदत केली आहे. त्यांच्या सर्व भानगडी मला माहीत आहेत. परंतु, आम्ही त्यात लक्ष घालत नाही. तुमची तयारी असेल तर सर्व प्रश्न घेऊन जनतेसमोर जाऊया. या सर्व प्रकरणात खासदारांचा बोलवता धनी वेगळाच असल्याची मला शंका आहे, असा टोला अमरसिंह देशमुख यांना आ. बाबर यांनी लगावला.
खासदारांनी एफआरपीचे पैसे द्यावेतविरोधकांनी दिशाभुलीचे राजकारण करू नये. सहकारी संस्थांना राजकारणातून त्रास होऊ नये, ही आपली भूमिका आहे. नागेवाडीच्या यशवंत साखर कारखान्याबाबत खासदार संजयकाका पाटील यांनी दिशाभूल करणारी वक्तव्ये सुरू केली आहेत. त्यामुळे अशी दिशाभुलीची वक्तव्ये करण्यापेक्षा त्यांनी उसाची एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, असेही आ. अनिल बाबर यावेळी म्हणाले.