लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : पुनवतपैकी माळवाडी (ता. शिराळा) येथील बाबासाहेब नामदेव भोळे व संभाजी नामदेव भोळे या दोन भावांच्या जनावरांच्या वस्तीवर बिबट्याने बुधवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात सहा शेळ्या, एक बोकड व कुत्रा ठार झाला. यात दोघा भावांचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे. वनविभागाने तातडीने धाव घेत नुकसानीचा पंचनामा केला.
पुनवतपैकी माळवाडी येथे भोळे बंधूंची शेतातच घर व जनावरांची वस्ती आहे. वस्तीच्या आसपास गवत व पिके आहेत. वस्तीवर दोघा भावांची जनावरे व शेळ्या बांधल्या होत्या. राखणीसाठी कुत्राही होता. बुधवारी पहाटेच्यासुमारास शेतातून आलेल्या बिबट्याने येथे हल्ला केला. अर्धवट बांधलेल्या भिंतीवरून आत उतरून बिबट्याने सहा शेळ्या, एक बोकड व कुत्र्याला ठार केले. त्यातील तीन मोठ्या शेळ्या वगळता बाकी शेळ्या, बोकड व कुत्र्याला बिबट्याने ओढून बाजूच्या गवताच्या शेतात नेऊन त्यांचा फडशा पडला. शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. मृत शेळ्यांमध्ये बाबासाहेब भोळे यांच्या पाच शेळ्या व कुत्रा, तर संभाजी भोळे यांच्या दोन शेळ्यांचा समावेश आहे.
चौकट
वानरांचा गलका
वस्तीजवळ शेतातील झाडांवर वानरांचा कळप मुक्कामाला होता. अचानक पहाटे वानरांनी मोठा गलका केला. नेमका त्याचवेळी बिबट्या शेतातून येऊन हल्ला करून पसार झाला असावा, असा अंदाज घटनास्थळी वर्तविण्यात आला.
वनक्षेत्रपाल सुशांत काळे, वनरक्षक प्रकाश पाटील, बिळाशीचे पशुवैद्यकीय अधिकारी माळी, अविनाश कदम, बाबासाहेब वरेकर, बाबा गायकवाड, मारुती पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
कणदूरपाठोपाठ पुनवतमध्ये बिबट्याने हल्ला केल्याने बिबट्या परिसरातच तळ ठोकून असल्याचे सिद्ध होत आहे.