सांगली : जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत दरोडा, वाटमारी, घरफोडी व चोरीचे ४२४ गुन्हे घडल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात नोंद आहे. चोरट्यांनी लाखो रुपयांच्या ऐवजावर ‘डल्ला’ मारला आहे. यातील २७६ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. पोलिसांची संख्या अपुरी, वाहनांची कमतरता ही कारणे यामागे आहेत. महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारुन लंपास करणे, अंगावर घाण टाकून पैशाची बॅग पळविणे, पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलांचे दागिने लंपास करणे, बँकेतून रोकड काढून बाहेर पडलेल्या ग्राहकांना लुटणे, दागिने खरेदीच्या बहाण्याने हातोहात दागिने लंपास करणे अशाप्रकारे चोरट्यांची गुन्हा करण्याची पद्धत बदलत आहे. अनेकदा चोरीसाठी लहान मुलांचा वापर केला जात आहे. नवीन गुन्हेगार पोलिसांच्या रेकॉर्डवर नाहीत. चोरी झाली की अनेकदा जुन्या गुन्हेगारांवरच संशय व्यक्त केला जातो. त्यांच्याकडून काही माहिती मिळते का याची चाचपणी केली जाते. कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद तसेच कर्नाटक, बिहार व ओरिसा या राज्यातील गुन्हेगारांनी आता जिल्ह्यात शिरकाव केला आहे. गुन्हा केला की, ते निघून जातात. त्यांचा शोध घेणे आव्हान आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावे २५ ते ४० किलोमीटर अंतरावर आहेत. हद्दही मोठी आहे. रात्रीच्यावेळी गस्त घालण्यासाठी केवळ एक मोटार व चार ते पाच दुचाकी असतात. प्रत्येक गावात पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू असला तरी, ते गल्ली-बोळात जाऊ शकत नाहीत. काही भागात गस्त घालण्याची ठराविक वेळ असते. या वेळेनंतर चोर डाव साधून जातात. पोलीस चौकी व ठाण्याजवळील दुकाने फोडण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. अनेकदा चोरी गेलेला माल जप्त करताना तारेवरची कसरत करावी लागते. तासगाव, विटा, आटपाडी परिसरात झालेल्या ‘बॅगलिफ्टिंग’च्या नऊ गुन्ह्यांचा चार महिन्यांपूर्वी छडा लावण्यात यश आले. हे गुन्हे करणारी टोळी ओरिसातील होती, पण शहरात घडलेल्या एका गुन्ह्याचा छडा लावता आला नाही. (प्रतिनिधी)
सहा महिन्यांत ४२४ चोऱ्या
By admin | Published: July 19, 2015 12:34 AM