नेलेॅ : अडीच महिन्याच्या विश्रांतीनंतर नेलेॅ (ता. वाळवा) येथे पुन्हा एकदा कोरोनाने एंट्री केली आहे. साेमवारी एका दिवसात एकाच घरातील ६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने गावामध्ये खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून ग्रामपंचायतने मंगळवारचा आठवडा बाजार रद्द केला आहे.
गेल्या आठवड्यात गावात २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले हाेते. यानंतर साेमवारी एकाच कुटुंबातील ६ जण पॉझिटिव्ह आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. ग्रामपंचायतीने रुग्ण आढळून आलेल्या परिसरात औषध फवारणीचे काम हाती घेतले आहे. कोरोना विषाणूच्या पहिल्या टप्प्यात गावामध्ये ९३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. तर ७ जणांचा मृत्यू झाला होता. अशा पार्श्वभूमीवर लोकांनी मास्क वापरावा, सामाजिक अंतर ठेवावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, संशय वाटल्यास तत्काळ काेराेना तपासणी करून घ्यावी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविशिल्ड लस घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर शिंदे यांनी केले आहे.