इस्लामपूर : इस्लामपूर येथे झालेला विवाह सोहळा एका वेगळ्या कारणाने सर्वांच्याच लक्षात राहिला. नेर्ले (ता. वाळवा) येथील रोहन अशोक पाटील आणि तुजारपूर येथील नीलम हरिश्चंद्र पाटील यांचा विवाह झाला. यानिमित्त वर-वधू व त्यांच्या घरातील अन्य ४ अशा एकूण सहाजणांनी नेत्रदान तसेच देहदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर यांच्या पुढाकाराने त्यांचा नेत्रदान व देहदानाचा अर्ज स्वीकारण्यात आला.
खरंतर लग्न हा आयुष्यातील सर्वात संस्मरणीय दिवस असतो. हाच दिवस सामाजिक भान ठेवून जर सत्कारणी लावला तर यापेक्षा दुसरी कोणतीही सुखद आठवण आयुष्यात असणार नाही, हे उपस्थित सर्वांनाच समजले. नेत्रदान व अवयवदान हे नेहमीच जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूरच्या अग्रस्थानी असलेले विषय आहेत. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने जायंट्सच्या या चळवळीला बळ मिळाले आहे. यावेळी जायंट्सचे अध्यक्ष दुष्यंत राजमाने, खजिनदार अॅड. श्रीकांत पाटील, प्रवीण फल्ले उपस्थित होते.
फोटो - १७०२२०२१-आयएसएलएम- देहदान न्यूज
इस्लामपूर येथे लग्न मंडपातच रोहन पाटील व नीलम पाटील या नवपरिणित जोडप्याने नेत्रदान व देहदानाचे अर्ज दुष्यंत राजमाने, अॅड. श्रीकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी संग्रामसिंह पाटील उपस्थित होते.