ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 18 - वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील शिक्षक कॉलनीतील सव्वानऊ कोटीच्या रोकड चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे यांच्यासह सहा पोलिसांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी ही कारवाई केली. या सर्व पोलिसांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
चंदनशिवेंसह सहाय्यक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार शंकर पाटील, दीपक पाटील, कुलदीप कांबळे व रवींद्र पाटील अशी निलंबित झालेल्या पोलिसांची नावे आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्याविरुद्ध कोडोली (ता. पन्हाळा) पोलिस ठाण्यात सव्वानऊ कोटी रुपयांची चोरी व अपहार असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. गुन्हे दाखल झाल्यानंतर हे सर्वजण दुसºयादिवशी सोमवारी ड्युटीवर हजर राहिले नाहीत. पोलिसांनीच सराईत चोरट्यांप्रमाणे एवढ्या मोठ्या रकमेवर डल्ला मारल्याचे उघडकीस येताच राज्यात खळबळ माजली होती. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पोलिस अधिकारी व कर्मचाºयांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कोल्हापूर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा अहवाल मंगळवारी सांगली पोलिस दलास प्राप्त झाला. या अहवालाआधारे पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी चंदनशिवेंसह सहा पोलिसांना निलंबित केल्याचा आदेश दिला आहे.
सूरज चंदनशिवे सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात (एलसीबी) नेमणुकीस होते. शरद कुरळपकर गुंडाविरोधी पथकात, दीपक पाटील व रवींद्र पाटीलही स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात, शंकर पाटील बॉम्बशोधक पथकात, तर कुलदीप कांबळे मिरज शहर पोलिस ठाण्यात सध्या नेमणुकीस होते. मार्च २०१६ मध्ये सव्वानऊ कोटीच्या रकमेवर ‘डल्ला’ मारल्यानंतर मेमध्ये पोलिसांच्या बदल्यांचे ‘गॅझेट’ फुटले. यात शरद कुरळपकर, शंकर पाटील, कुलदीप कांबळे यांच्या बदल्या झाल्या. चंदनशिवे, दीपक व रवींद्र पाटील एलसीबीतच राहिले. मंगळवारीही यातील कोणीही ड्युटीवर हजर राहिले नव्हते.
विश्वनाथ घनवट यांचा अहवाल सादर- शिंदे
पोलिसप्रमुख शिंदे यांनी या प्रकरणातील पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्यााबाबतचा अहवाल कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना सादर केला आहे. नांगरे-पाटील यांच्याकडून घनवट यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. घनवट यांची सांगली जिल्ह्यात चार वर्षांची सेवा पूर्ण होत आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण, मिरज गांधी चौक येथे त्यांची सेवा झाली आहे. सध्या त्यांच्याकडे गुंडाविरोधी पथकाचा कार्यभार होता.