कवठेमहांकाळ : येथील आनंद सागर शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी मिनी बस मंगळवारी सकाळी रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर लांडगेवाडी (नरसिंहगाव)जवळ उलटून झालेल्या अपघातात सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले. तर इतर विद्यार्थीही किरकोळ जखमी झाले आहेत.
विभावरी विनायक पोतदार, विकास विनायक पोतदार, ऋग्वेद चव्हाण, सान्वी अभिजित सगरे, समृद्धी सावंता माळी, अनन्या प्रदीप पवार अशी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. कवठेमहांकाळ पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. शाळा व्यवस्थापनावर कारवाईची शक्यता आहे. बसचा चालक आजारी होता, त्याला डोळे आले होते. तरीदेखील तो कामावर आल्यामुळे अपघात घडल्याची माहिती पुढे येत आहे.
कवठेमहांकाळ येथील आनंद सागर पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनी सकाळी लवकर विद्यार्थ्यांना घेऊन बस (एमएच १२ - एफसी ९११३) निघाली. लांडगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटून बस उलटली. अपघातस्थळी तातडीने नागरिक व वाहनधारक जमले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच राष्ट्रीय महामार्ग वाहतूक नियंत्रण कक्षाचे सहायक निरीक्षक अतुल लोखंडे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनीही जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यास मदत केली. जखमी विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
अपघातातील बसची अवस्था अत्यंत वाईट आहे. कोणतीही कागदपत्रे नसलेली बस रस्त्यावर कशी फिरत होती, असा सवाल उपस्थित होत आहे. बस नादुरुस्त असताना पालकांनी पाल्यांना का बसविले, असाही प्रश्न विचारला जात आहे.
आनंद सागर शाळेचा कारभार वादग्रस्त ठरला आहे. यापूर्वी परवानगी नसताना बेकायदेशीरपणे शाळा चालविल्याबद्दल शाळेवर कारवाई केली होती. त्यानंतर काही काळ शाळा बंद होती. सध्या दुसऱ्या एका संस्थेच्या नावावर शाळा चालविण्याचा उद्योग पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
आरटीओ व पोलिसांची कोणतीही परवानगी नसताना शाळेमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी वाहने वापरली जात होती. विनापरवाना विद्यार्थी वाहतूक करून जीवितास धोका उत्पन्न होईल असे कृत्य केल्याबद्दल संस्था चालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पालक व नागरिक करीत आहेत.