सांगली : शिक्षक बँकेत विरोधी संघाची सत्ता असताना, कर्जावरील व्याजाचा दर २१ टक्के पर्यंत होता. पुरोगामी सेवा मंडळ व शिक्षक समितीच्या सत्ताकाळात गेल्या पाच वर्षांत अर्धा ते साडेतीन टक्क्यापर्यंत सहावेळा व्याजदरात कपात केली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुनील गुरव यांनी पत्रकार बैठकीत दिली.
सभासदाभिमुख व पारदर्शी कारभाराच्या धास्तीपोटी विरोधकांकडून बोगस आरोप केले जात आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी दहा वाजता होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी संचालकांनी केलेल्या आरोपांना अध्यक्ष गुरव यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, विरोधकांच्या सत्ताकाळात ३६ कोटींच्या कायम ठेवी परत केल्या होत्या. गेल्या वेळेलाही १६ कोटी परत केले. यंदाही सभासदांच्या मागणीनुसार कायम ठेवी परत करण्याचे धोरण निश्चित केले आहे. पण ते ऐच्छिक असेल. त्याच्या पोटनियम दुरुस्तीमुळे विरोधकांची कोल्हेकुई कायमची बंद होणार आहे. विरोधकांनी कर्जाचा व्याजदर २१ टक्क्यांपर्यंत केला होता. पुरोगामी सेवा मंडळाने गत दहा वर्षांत तो साडेबारा टक्क्यापर्यंत आणि आता दहा टक्क्यांपेक्षाही खाली आणला. पाच वर्षांत सहावेळा व्याजदरात कपात केली आहे.
गेल्या काही वर्षांत दोन ते तीन टक्के लाभांश दिला जात आहे. कार्यक्षेत्र वाढीचे सभासदांनी स्वागत केले आहे. सभासद वाढल्याने व्यवसाय वाढला आहे. पण विरोधकांच्या हे पचनी पडलेले दिसत नाही. बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून, रिझर्व्ह बँकेनेही कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. लेखापरीक्षकांनी बँकेला ‘अ’ वर्ग दिल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
सत्ताधाऱ्यांचे निर्णय
१. मृत कर्जदार सभासदांना दीड लाखापर्यंतची आर्थिक मदत देणार
२. शेअर्स रकमेचे सहा टक्क्याऐवजी पाच टक्क्याने कपात
३. सेवानिवृत्त शिक्षकांचे सभासदत्व कायम ठेवणार
४. मासिक कायम ठेवी परत करणार