सांगली : विटा शहरातील एका सहा वर्षीय बालकाचा मेंदुज्वराने मृत्यू झाला. त्याच्या रक्ताचे नमुने पुणे प्रयोगशाळेला पाठविण्यात आले असून, त्याला चंडीपुराची लागण झाल्याविषयी तपासणी केली जाणार आहे.दोन-तीन दिवसांपूर्वी त्याला ताप आल्याने पालकांनी स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्याची प्रकृती गंभीर झाल्याने सांगलीत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान गुरुवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक अहवालानुसार त्याला मेंदुज्वर स्पष्ट झाला आहे. मात्र, मृत्यूच्या नेमक्या कारणाचा शोध आरोग्य विभाग घेत आहे.त्याच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याला चंडीपुराची लागण झाली आहे का? याचीही तपासणी होणार आहे. चाचणीचा अहवाल रविवारी किंवा सोमवारी प्रशासनाला प्राप्त होईल. त्यानंतर, मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट होईल, अशी माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजयकुमार वाघ म्हणाले, बालकाचा मृत्यू मेंदुज्वराने झाला आहे. मात्र, खबरदारीसाठी आणि मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठविले आहेत. त्याला चंडीपुराची लागण झाल्याची शक्यता वाटत नाही. जिल्ह्यात सध्या चंडीपुराचा एकही रुग्ण नाही.
Sangli: सहा वर्षाच्या बालकाचा विट्यात मेंदुज्वराने मृत्यू, चंडीपुराच्या दृष्टीने रक्तचाचणी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 3:29 PM