सांगली : बेळगाव येथील रोटरॅक्ट क्लब व शिवगंगा स्केटिंग क्लबच्यावतीने बेळगाव येथे विश्वविक्रमी स्केटिंग उपक्रमात सांगली, मिरज व कुपवाडमधील १४ खेळाडूंनी सहभाग घेत विक्रम नोंदविला. सलग ९६ तास स्केटिंग करीत त्यांनी विक्रमाला गवसणी घातली.बेळगाव येथे ३० मे ते ३ जून या कालावधित हा उपक्रम पार पडला. ९६ तास लार्जेस्ट स्केट मोटो फाॅर्मेशन स्केटिंगचा विक्रम करण्यात आला. त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. यासाठी संपूर्ण देशातून ४९६ स्केटिंग खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यात सांगली, मिरज, कुपवाड रोलर स्केटिंग असोसिएशन व सई स्केटिंग अकॅडमीच्या १४ जणांनी सहभाग घेतला. त्यांनी यशस्वीपणे विक्रम नोंदविल्याने लवकरच याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. या विक्रमामुळे सांगलीच्या स्केटिंग खेळाडूंचे नाव सुवर्णाक्षरात कोरले जाणार आहे.
या उपक्रमासाठी सांगलीचे आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक सुरज शिंदे यांची निवड करण्यात आली होती. या सर्व खेळाडूंना महापौर दिग्विजय सूर्यवंशी, पृथ्वीराज पवार, उपाध्यक्ष प्रदीप घडशी, अभिजित मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
यांनी केला विक्रम...विश्वविक्रमी उपक्रमात यश मिळविलेल्यांमध्ये सौ. परवीन शिंदे, साईश वडेर, सई शिंदे, पंकजसिंग देशमुख, अनुजा सूर्यवंशी, आराध्या मोरे, अहद मुलाणी, गायत्री मित्तू, ईशांत मित्तू, विराज कदम, श्लोक काळे, वृषकेत आडमुठे, माहेश्वरी कदम, रूद्र सरगर यांचा समावेश आहे.