ऑनलाइन लोकमत
कडेगाव (सांगली), दि. 8 - हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखला जाणा-या कडेगाव येथील ऐतिहासिक मोहरम सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. येथील मोहरमचे प्रमुख आकर्षण असलेल्या ताबूतांच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, बुधवार, १२ रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा रंगणार आहे.
सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील मोहरम संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. आकाशाला उंच भिडणारे ताबूत आणि त्यातून दिसून येणारे हिंदू-मुस्लिम ऐक्य हे येथील मोहरमचे खास वैशिष्ट्य मानले जाते.
करबलाच्या मैदानात इस्लामचे प्रेषित मोहम्मद पैगंबरांचे लाडके नातू हजरत इमाम हुसेन यांनी कुर्बानी देऊन इस्लाम जिवंत ठेवला, म्हणून सर्व जगभर मोहरम सण साजरा केला जातो. मोहरम साजरा करण्याच्या विविध परंपरा दिसून येतात. त्यामध्ये ताजीयदारी ही एक परंपरा आहे. भारतात लखनऊ, पाटणा, कोलकाता, दिल्ली, बेंगलोर, मुंबईसह महाराष्ट्रात काही ठिकाणी ताजीया (ताबूत) काढण्याची प्रथा आहे. कडेगावला ताबूतांची परंपरा गेल्या १९० वर्षांपासूनची आहे. ताबूतांना येथे ‘डोले’ असे म्हटले जाते. मोहरमला डोल्यांची यात्रा असेही संबोधले जाते.
सुमारे १०० ते १२५ फूट उंचीचे ताबूत येथे उभारले जातात. ही उभारणी एक महिना अगोदर म्हणजे बकरी ईदपासून सुरू केली जाते. ताबूतांची उभारणी कळक-बांबूच्या साहाय्याने होते. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले असून, ताबुतांच्या मजल्यांना रद्दी कागद लावण्याचे काम सुरू आहे. नंतर त्यावर रंगीत कागद लावून नक्षीकाम होईल.
कडेगाव येथे १४ ताबूत बसविले जातात. त्यापैकी निम्मे ताबूत हिंदूंचे असतात. ताबूतांचा मानपान हिंदू बांधवांकडे असतो, तर हिंदू बांधवांच्या सणातील मानपान मुस्लिम बांधवांकडे असतो. ही परंपरा सुरुवातीपासून जोपासली जात आहे.
दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत भेटी सोहळा आणि मिरवणुका होतील. कडेगाव नगर पंचायत, तहसील कार्यालय, पंचायत समितीकडूनही मोहरमची तयारी सुरू आहे. ताबूत उभारणीस युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, राजाराम गरुड, संग्रामसिंह देशमुख यांनी भेटी देऊन पाहणी केली आणि मुस्लिम समाजाला इस्लामी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.