संजयनगर/ सांगली : शहरातील माळ बंगला माधवनगर रोड येथील महानगरपालिकेच्या ५६ एमएलटीमधील पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसच्या इमारतीचा स्लॅब शुक्रवारी सायंकाळी ४ वाजणाच्या सुमारास कोसळला. यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. येथे कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. याठिकाणी काम करणारा एक कर्मचारी सुदैवाने वाचला.
लोकमत मध्ये या पंपीग हाऊसच्या इमारतीची दुरवस्था झाल्याचे वृत्त व छायाचित्रे प्रसिध्द झाले होते. यावेळी लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाने लक्ष दिले नाही. याप्रकरणी महापालिकेने गांभीर्य न दाखवल्याने आज हा प्रकार घडल्याचे नागरिकांनी सांगितले.
महानगरपालिका आयुक्त कापडणीस यांनी तत्काळ येथील इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करून घ्यावे आणि कोणकोणत्या इमारती धोकादायक आहेत त्याचा अहवाल मागवून पुढील अपघात होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.