लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : कोरोना आपत्तीमुळे शासनाने सर्व आस्थापने बंद करण्याचा आदेश दिला आहे. महापालिका रस्त्यावर, गल्ली-बोळात फिरून सुरू असलेल्या आस्थापनावर दंडात्मक कारवाई करत आहे; पण महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या कत्तलखान्यावर कारवाई केली नाही. शुक्रवारी शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे आणि त्याच्या कार्यकर्त्यांना कत्तलखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकला. सर्व आस्थापने बंद आदेश असताना हा महापालिका कत्तलखाना सुरू कसा ठेवला, असा संतप्त सवाल केला.
आज महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांना घेऊन कत्तलखाना येथे छापा मारला. या ठिकाणी 40 कामगार होते आणि जनावरांची कत्तल सुरू होती. अधिकाऱ्यांनी पंचनामा करून वरिष्ठ पातळीवर करवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. पंचवीस लोकांपेक्षा एक व्यक्ती जास्त असली तर मंगल कार्यालयावर ५० हजार रुपये दंड महापालिका करते आणि याठिकाणी ४० कामगार घेऊन शासनाचा नियम भंग करणाऱ्या कत्तलखान्यावर कारवाई करून कत्तलखाना बंद नाही केला तर आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी दिला आहे.