सांगली - महापालिकेच्या आमराई उद्यानातील ८ झाडांची रविवारी कत्तल करण्यात आली. सुट्टीचा दिवस पाहून ही झाडे तोडण्यात आली आहे. उद्यानाजवळील ऑफिसर्स क्लबच्या टेनिस कोर्टावर पालापाचोळा पडतो म्हणून झाडांची तोड करण्यात आली. उद्यान अधिक्षक शिवप्रसाद कोरे यांनी पंचनामा करून संबंधिताना नोटीस बजाविणार असल्याचे सांगितले. तर राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी उद्यान अधिकार्यांसह क्लबच्या सचिवांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी थोरात यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सागर घोडके, शिवसेनेचे मयुर घोडके, नितीन चव्हाण यांनी आमराईत ठिय्या आंदोलन केले.
आमराईला लागून उत्तर बाजूला ऑफिसर्स क्लब आहे. याठिकाणी टेनिस कोर्ट असून त्या कोर्टावर उद्यानातील झाडांचा कचरा पडतो म्हणून महापालिकेकडे फांद्या तोडण्याची परवानगी मागण्यात आली होती. अद्याप परवान्याची प्रक्रिया सुरू असताना रविवारी दुपारी क्लबच्यावतीने परस्परच ८ झाडे तोडण्यात आली. दोन ते तीन झाडे बुंद्यापर्यंत तोडली आहेत. सोमवारी सकाळी आमराईत फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या निदर्शनास ही बाब येताच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी तात्काळ धाव घेतली. त्यांनी अधिकार्यांना जाब विचारला. तसेच कारवाई होईपर्यंत आंदोलनाचा इशारा दिला. आयुक्त रविंद्र खेबूडकर यांनीही संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.